ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : वीस वर्षांपूर्वी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांना वेट लिफ्टिंगमध्ये करिअर करता आले नाही. तरी ते राज्य स्तरापर्यंत खेळले. त्यांचे अपूर्ण स्वप्न मुलगी हर्षदा गरुडने ग्रीस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून पूर्ण केले. त्यामुळे जिंकलंस पोरी ! तू आमच्या कष्टाचे चीज केलेस, या शब्दांसह तिच्या आईवडिलांना आनंदाश्रू अनावर झाले.
ग्रीस येथील ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळच्या हर्षदा गरुड हिने सोमवारी सुवर्ण पदक पटकाविले. तिने ४५ किलो वजनी गटातील सुवर्ण पदक मिळवून मावळनगरीचे नाव जागतिक नकाशावर झळकावले. त्यामुळे हर्षदाच्या घरी परिसरातील नागरिक दिवसभर पेढे घेऊन येत, त्यांचे अभिनंदन करत होते.
हर्षदा वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलमधे बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. शिवाय जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिंकत तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मजल मारली होती. २०१९ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वीच तिची भारतीय संघात निवड झाली होती. त्याच वेळी आपण पदक जिंकूनच परत येण्याचा तिने निश्चय केला होता, असे प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांनी सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीवर मातहर्षदाचे वडील शरद हे वडगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. तर आई रेखा या गृहिणी आहेत. वडिलांना खेळात विशेष आवड होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करता आले नाही. त्यामुळे त्यांनी मुलगी हर्षदाला वेटलिफ्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हर्षदाला कोणत्याही गोष्टीसाठी कमतरता भासणार नाही. यासाठी आईवडिलांनी अहोरात्र कष्ट घेतले.
हर्षदाला खेळाडू बनवायचे हे लहानपणापासून ठरवले होते. दुबे सरांकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. आज तिने आमचा विश्वास सार्थकी लावला. हर्षदाने मिळविलेल्या यशाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिने घेतलेली मेहनत आणि आम्ही तिच्यासाठी घेतलेल्या कष्टाचे सुवर्ण पदकाने चीज झाले.
- शरद व रेखा गरुड, आई-वडील
हर्षदाने तिची निवड योग्य असल्याचे सिद्ध केल्याबद्दल आनंद आहे. हर्षदा लहान असतानाच तिच्यात हे गुण दिसले होते. तिच्या वडिलांनीही माझ्याकडेच प्रशिक्षण घेतले आहे. मावळ परिसरात हर्षदासारखे अनेक हिरे आहेत. त्यांना प्रोत्साहन व मदत मिळाली, तर अनेक खेळाडू घडतील.
बिहारीलाल दुबे, प्रशिक्षक
आजचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. आई-वडिलांचे कष्ट, प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांचे मार्गदर्शन आणि सर्वांचे सहकार्य यामुळे हे यश मिळू शकले. भारतीय संघात निवड झाली त्यावेळी एक पदक आणणारच हे ठरवलं होतं. मात्र, सुवर्णपदक मिळाले.
- हर्षदा गरुड, विजेती.