वडगाव मावळ : एशियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर वडगांव मावळची हर्षदा गरुडने पुन्हा एकदा वेटलिफटिंगमध्ये निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. ताश्कंद येथे 17 ते 25 जुलै 2022 पर्यंत सुरू असलेल्या ज्युनिअर एशियन वेटलिफटिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत आज 45 किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅच प्रकारात 69 किलो व क्लीन आणि जर्क प्रकारात 88 किलो असे एकूण 157 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक मिळविले.
वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुल ची खेळाडू हर्षदाने मे महिन्यात ग्रिस येथे झालेल्या जागतीक वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. हे पदक मिळविणारी भारतातील पहिली महिला होण्याचा मान मिळविला होता. आज ताशकंद येथे सुरू असलेल्या एशियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात यश मिळविले. सध्या ती पटियाला येथील इंडिया कॅम्प मधे सराव करत आहे. येणाऱ्या भविष्यकाळात हर्षदा भारतीय वेटलिफ्टींग मधे इतिहास निर्माण करेल असा विश्वास तिचे कोच बिहरीलाल दुबे यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे चेअरमन गणेशजी काकडे यांनी देखील हर्षदाच्या कामगिरीबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वडगांव मावळला क्रिडाक्षेत्राचा वारसा आहे. तसेच वेटलिफ्टींगची पंढरी म्हणूनही वडगांवची ओळख आहे. हर्षदाच्या कामगिरीतील सातत्याने ही ओळख जगभरात पोहोचली. या शब्दात वडगांव मावळ नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी हर्षदाचे कौतुक केले. मावळ तालुक्यातील क्रीडाक्षेत्र व नागरिकांकडून तिचे कौतुक होत आहे.