पिंपरी : भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर हर्षदा गरुडने वेटलिफ्टिंगमधील वर्चस्व सिद्ध केले. हरियाणा येथे सुरू असलेल्या खेलोइंडिया स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅच प्रकारात ६९ किलो व जर्क प्रकारात ८३ किलो असे एकूण १५२ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक मिळविले.
वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलची खेळाडू हर्षदाने मे महिन्यात ग्रीस येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. हे पदक मिळविणारी भारतातील पहिली महिला होण्याचा तिने मान मिळविला. सध्या ती पटियाला येथील इंडिया कॅम्पमध्ये सराव करत आहे. या कामगिरीमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तिची निवड होईल, अशी अपेक्षा तिचे गुरू बिहारीलाल दुबे यांनी व्यक्त केली.
हर्षदाच्या या कामगिरीने वडगावच्या क्रीडा क्षेत्रात अजून एका सुवर्णपदकाची भर पडली. याबद्दल हर्षदाचे मावळ तालुक्यातील क्रीडा क्षेत्र व नागरिकांकडून कौतुक होत आहे.