पुणे : हर्षल काटेने दमदार फलंदाजी करीत तब्बल ३७३ धावा झळकावल्याने केडन्स पुणे संघाने जालना जिल्हा संघावर एक डाव आणि ५०१ धावांनी दणदणीत विजय मिळविला.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना केडन्स पुणे संघाने ८ बाद ६२७ धावा झळकाविल्या. हर्षल काटेने ४९ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ३७३ धावा केल्या. कौशल तांबे (३५), विनय गायकवाड (५८), आयुष देव (नाबाद ७९) यांच्या सहकार्याने पार्क मैदानावर प्रथमच विक्रमी धावसंख्या नोंदविली गेली. जालन्याकडून चिन्मय मुळेने १३७ धावांत दोन, निखिल वाघमारे याने ११६ धावांत दोन व सचिन सापाने ७३ धावांत दोन गडी बाद केले. ऋषीकेश काणे, गौरव निंभोरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.प्रत्युत्तरात जालना संघाचा पहिला डाव ६७ धावांवर संपुष्टात आला. गौरव निंभोरेने सर्वाधिक १८ धावा केल्या. त्यांचा फक्त गौरवच दुहेरी धावसंख्या उभारू शकला. केडन्सकडून शुभम खरातने सहा धावांत चार, तन्मय नेर्लेकर याने २३ धावांत तीन गडी बाद केले. विनय गायकवाड, गौरव कुमकर याने प्रत्येकी एक गडी बाद केला. यामध्ये २५ अवांतर धावांचा समावेश होता. जालन्याचा दुसरा डाव ५९ धावांवर संपुष्टात आला. सचिन सापाने १५, लक्ष बाबरने १३ धावा केल्या. कुशाल तांबेने १४ धावा देत सहा गडी बाद केले. शुभम खरातने दोन व तन्मय नेर्लेकरने एक गडी बाद केला.
हर्षदची त्रिशतकी खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:13 AM