इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मामांचेच आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:24 PM2019-09-19T18:24:58+5:302019-09-19T18:27:05+5:30
इंदापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.
कळस : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा म्हणून ओळखले जातात. त्यांचे आव्हान असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांना त्यांचे सख्खे मामा आप्पासाहेब जगदाळे यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील इंदापुरातील गटबाजी उघड झाली आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाटील करत आहेत.
इंदापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. पाटील यांचे सख्खे मामा जगदाळे यांनीही भरणे यांच्यासाठी प्रयत्न केले होते. यावेळी विद्यमान आमदार असल्याने भरणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे पाहून पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर जगदाळे यांनी सराटी येथे मेळावा घेऊन आपली उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. भरणे यांच्या व्यतिरिक्त इच्छुकांना पैकी कोणालाही उमेदवारी द्यावी.त्याचा कार्यकर्ते एकदिलाने काम करतील ,असा ठराव या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यास अशोक घोगरे, गणेश झगडे, भाऊसाहेब सपकळ यांच्यासह छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप,,शशिकांत तरंगे, कांतीलाल जामदार,रामभाऊ पाटील,विठ्ठलराव ननवरे,संजय निंबाळकर आदी उपस्थित होते. जगदाळे यांनी आव्हान दिले असले तरी कोणताही वेगळा निर्णय न घेता उमेदवारीबाबत अजित पवार यांचाशब्द अंतिम मानला जाईल,असा निर्णय या गटाने जाहीर केला आहे.
मात्र, गेल्यावेळी या सगळ्या नेत्यांनी भरणे यांचे काम केल्याने इंदापूर तालुक्यातील जातीय समीकरण बदलले होते. त्याचा फायदा भरणे यांना झाला होता. त्यामध्येच बिघाड करण्याचा पाटील यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्याला या मेळाव्याच्या रुपाने सुरूवात झाली आहे.