पुणे/इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे वारंवार जिल्ह्यात दाैरे करत आहेत. त्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत दिले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी वेगळी चूल मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अद्यापपर्यंत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी मतदारसंघातील घडामोडी पाहता हातात कमळ असले तरी मनात तुतारी आहे, पण तिथेही जाण्यासाठी वाट अडचणीची असल्याने हर्षवर्धन पाटलांना विमानाचेही वेध लागले आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. १९९५ मध्ये तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. २००९ पर्यंत हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणूनच निवडून येत होते. मात्र, त्यांनी काँग्रेसलाच झुकते माप दिले. त्यांचा सहकारातील अभ्यास पाहता काँग्रेसने सहकारमंत्री बनवले होते. २०१४ मध्ये अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच त्यांचा वचक कमी करण्याचा प्रयत्न केल्याचीही तालुक्यात चर्चा आहे. भाजपनेच तीच संधी साधून हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरवले, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नसल्याने भाजपही नाराज असल्याचे समजते. दुसरीकडे आगामी विधानसभेत भाजपकडून उमेदवारी घेण्याचे पाटील यांनी बागळले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार आपल्या आमदारांसमवेत महायुतीत सहभागी झाल्याने पाटील यांची मोठी गोची झाली. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत विधानसभेचे आश्वासन देत हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांचे काम करण्यास सांगितले. मात्र, तसे झालेच नाही. त्यातच सध्या उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेवर दावा सांगितला असून आमदार दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात हर्षवर्धन पाटील असल्याचे हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यातच मंगळवारी वसंतदादा शुगर गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी येथे बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामध्ये विधानसभेच्या उमदेवारीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी दोघांतील चर्चेचा विषय फेटाळला असला तरी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फडणवीसांच्या निर्णयाची वाट पाहतोय : पाटील
वसंतदादा शुगर गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, शरद पवार आणि माझ्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी कुठलीही भूमिका जाहीर केली नाही. तालुक्यातील विद्यमान आमदाराला तिकीट मिळेल, अशी चर्चा आहे. मी निवडणूक लढवावी, असा आमच्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिले होते त्याबाबत तीन आठवड्यांपूर्वी माझी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. तेव्हा, फडणवीसांनी निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे विधानसभेच्या तयारीबद्दल चर्चा करण्याचा विषय नाही. आम्ही कायम लोकांमध्ये असतो. देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पातळीवर विधानसभेबद्दल काय निर्णय होतो, ते पाहू, असे पाटील यांनी सांगितले.
भाजपच्या सर्व्हेने दोघांनाही नाकारले ?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मतदारसंघनिहाय सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने दावा सांगितलेल्या मतदारसंघांचाही सर्व्हे केला. त्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघात आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनाही मतदारांनी नाकारल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना याची कानकुन लागल्यानेच त्यांनी १९९५ मध्ये तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. ती आघाडी पुन्हा पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने गावोगावी बैठकाही सुरू आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
शरद पवारांची नेहमीच साथ
शरद पवार यांनी नेहमीच हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली आहे. २००९ लोकसभा निवडणूक अटीतटीची झाली. त्यावेळी इंदापूर बाजार समितीत झालेली शेवटची सभा शरद पवार यांनी चांगलीच गाजवली अन् हर्षवर्धन पाटील निवडून आले. त्यानंतर पाटील हे जरी भाजपमध्ये गेले असले तरी वेळोवेळी पवारांनी त्यांना झुकते माप दिले. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मयोगी साखर कारखान्याच्या सभासदांची आर्थिक कोंडी सुटावी म्हणून पुणे जिल्हा बँकेकडे २०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून थेट शरद पवारांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय साखर महासंघांच्या अध्यक्षपदी निवडीवेळीही पवारांनीच कळत न कळत पाठिंबा दिल्याचीही चर्चा आहे. यामुळे शरद पवारांबरोबर त्यांचे स्नेह कायम असल्याचे दिसते.