लाखेवाडी : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शनिवारी (दि. २७ ) इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी व पिंपरी बु. येथे जुन्या पिढीतील ज्येष्ठ मार्गदर्शकांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये सर्वजण रमून गेले.
जुन्या पिढीतील ज्येष्ठ मार्गदर्शक मारुतीभाऊ घोगरे यांची हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी येथे भेट घेतली. मारुतीभाऊ आज १०५ वर्षांचे आहेत. या वयातही त्यांची तब्येत उत्तम आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या सामाजिक, राजकीय प्रवासाचे मारुतीभाऊ खंदे समर्थक आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कात्रज जिल्हा दूध संघाचे संचालक, अकलूज कारखान्याचे संचालक, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार या राजकीय प्रवासामध्ये मारुतीभाऊ यांची मोलाची साथ व मार्गदर्शन मिळाले, हे नाते आजही कायम आहे. या भेटीत गप्पांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अनेक जुने किस्से सांगताना हास्याचे फवारे उडाले. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी दुसरे जुन्या पिढीतील मार्गदर्शक पांडुरंगनाना बोडके (पिंपरी बु.) यांची सदिच्छा भेट घेतली. पांडुरंगनाना वय वर्षे ७५ च्या घरात आहेस. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या घटनांना उजाळा देत गप्पा मारल्या. दरम्यान, मारुतीभाऊ घोगरे, पांडुरंगनाना बोडके अशा अनेक ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या नि:स्वार्थी सहकार्यामुळे मी घडलो, त्यांच्या भेटीतून नवी ऊर्जा प्राप्त होते, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी व पिंपरी बुद्रुक येथे मारूतीभाऊ घोगरे व पांडुरंगनाना बोडके यांची सदिच्छा भेट घेतली.
२९०३२०२१-बारामती-०१