हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 21:30 IST2019-04-09T21:30:07+5:302019-04-09T21:30:31+5:30
संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे.

हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती
पुणे : देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसून मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आघाडीसाठी राज्यात चांगले वातावरण असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ईव्हीएम मशिनबाबत मात्र भीती व्यक्त केली आहे. ईव्हीएम यंत्रणेबाबत निवडणुकीत सतर्क राहावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर येथील उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएमबाबत उच्च न्यायालयात तक्रार दिली आहे. त्याचा आधार घेत पाटील म्हणाले, निवडणुक पारदर्शकपणे पार पडणे आवश्यक आहे. आता कोणतीही लाट नाही. सरकारविषयी रोष आहे. संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता ईव्हीएम यंत्रणेवर बारकाईन लक्ष द्यावे लागले. त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. ईव्हीएमबाबत तक्रार दिल्यास निवडणुक आयोगाने त्याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारले असता पाटील यांनी त्याला बगल दिली. पक्ष सोडण्याबाबत त्यानांच विचारा असे सांगत त्यांनी बोलण्याचे टाळले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही यावेळी उपस्थित होते. त्यांनाही या मुद्यावर बोलण्यास नकार दिला.
------------
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली
बारामती लोकसभा मतदारसंघातील काही जणांच्या अडचणी होत्या. दहा दिवसांपासून चर्चा सुरू होती. एक-एक प्रश्नाची उत्तरे मिळत गेली. त्यानंतर सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. भोरमध्येही मेळावा घेण्यात आला आहे. सासवडमध्ये सर्वजण कामाला लागले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.