कळस : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इतर पक्षात गेलेल्या आपल्या जुन्या सवंगड्यांची मोळी बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याची प्रचीतीच रुई येथे झालेल्या गजढोल स्पर्धेच्या वेळी आली. पूर्वाश्रमीचे पाटील यांचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहत पाटील यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
इंदापूर तालुक्यातील बाबीर यात्रा ही धार्मिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय यात्रेत विविध राजकीय रंगही पाहावयास मिळतात. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची जुगलबंदी, तसेच उपस्थिती पाहायला मिळते. राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे यांनी आयोजिलेल्या गजढोल स्पर्धेला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनपेक्षितपणे उपस्थिती लावली.गेल्या काही वर्षांपासून यात्रेनिमित्त पाटील देवदर्शनासाठी येत असतात. मात्र ते गजढोल स्पर्धेकडे फिरकत नव्हते. यंदा मात्र अनेक वर्षांनंतर स्पर्धेच्या या व्यासपीठावर उपस्थिती लावल्यानंतर अनेक जण अचंबित झाले. भिसेंचे आदरातिथ्य स्वागत स्वीकारल्यानंतर पाटील यांनी त्यांच्यावर जाहीर स्तुतिसुमने उधळली. शिवाय या स्पर्धेसाठी पंधरा हजारांचे रोख बक्षीसही दिले. भिसे यांच्या व्यासपीठावरील पाटील यांची उपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
भिसे यांनी पाटील यांच्याबरोबर असताना जिल्हा परिषद सदस्य व पक्षाचे गटनेतेपदही भूषविले होते. परंतु काही कारणास्तव वेगळी वाट धरून दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या वीस वर्षांपासून बाबीर यात्रेमध्ये गजढोल स्पर्धेचे आयोजन करून, विजेत्या संघांना सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मागील वर्षापर्यंत पाटील भिसे यांच्या गजढोल स्पर्धेकडे फिरकले नव्हते. मात्र यंदाच्या कार्यक्रमात पाटील यांची उपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.