पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनीच कोंडी केली असली तरी त्यांच्या भाषणबॉम्बनंतर आता मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे नेते त्यांच्याशी संपर्काच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादीकडूनही त्यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पाटील यांनी बुधवारी इंदापूर येथे जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाटील यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांचा संपर्क होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप म्हणाले, पाटील यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते काँग्रेसमध्येच राहतील. ९ सप्टेंबरपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, इंदापूरच्या जागे संदर्भात अद्याप कोणत्याही स्वरुपाचा निर्णय झालेला नाही. तरीही पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांवर केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहे.काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप जागा वाटपाबाबत चर्चाच सुरु आहे. यामध्ये काही जागांचा तिढा सुटला असून, इंदापूरच्या जागेसंदर्भात अद्याप काही ही बोलणी झालेली नाही. मी स्वत: पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांचा फोन बंद आहे. यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे मी निरोप पाठवला असून, लवकरच त्यांच्या संपर्क होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी पाटील यांची पाठराखण केली नाही. त्यामुळे ते एकटे पडल्याचीही चर्चा सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाºया या तीन विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे हे मातब्बर नेते आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच या तीनही नेत्यांवर भारतीय जनता पक्षाकडून गळ टाकण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, युतीच्या जागावाटपात या तीनही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहेत.
पुरंदरमध्ये जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे पुरंदरमधून इच्छुक असलेले जगताप आणि भोरचे आमदार थोपटे यांनी भाजपाकडे पाठ फिरविली. मात्र, पाटील यांची चर्चा सुरूच राहिली. पाटील यांच्यापासून आपण अंतर राखून आहोत हे देखील त्यांनीच दाखविले. त्यामुळेच पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती अध्यक्षपदावर संधी दिली गेली नाही. जिल्हाध्यक्ष जगताप यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना स्वत: पत्र लिहून दत्ता झुरंगे यांची निवड व्हावी असे कळविले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकांत ज्या पक्षाचा आमदार निवडून आला त्याला ती जागा असे सूत्र काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात ठरले आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. पाटील जसे जबरदस्त नेते आहेत, तसेच भरणेही आहेत. मात्र, तरीही याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवारच घेतील. हा निर्णय होण्यापूर्वीच पाटील यांच्यासारख्या आघाडीच्या जबाबदार नेत्याने वाईट पध्दतीने टीका करणे गैर आहे.