हर्षवर्धन पाटील यांना धक्का : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अंकिता पाटील ऐवजी झुरंगे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 02:48 PM2019-08-22T14:48:41+5:302019-08-22T15:03:36+5:30
हर्षवर्धन पाटील यांची काँग्रेसचे विश्वासू म्हणून ओळख आहे. मात्र,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून दिला डच्चू..
पुणे : जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांना पक्षांकडून मोठा धक्का बसला आहे. पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी चर्चेत असलेल्या अंकिता पाटील यांच्या नावाचा पत्ता कापत ऐनवेळी दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे आले आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या होत्या. त्यांच्या निधनानंतर बावडा गटातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील निवडुण आल्या. यामुळे स्थायी समितीवर काँगे्रसकडून अंकिता पाटील यांचे नाव चर्चेत होते. अंकिता या कुठल्या समितीच्या सदस्य नसल्याने त्यांनाच संधी मिळेल हे निश्चित होते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून अंकिता पाटील यांचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे.
काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते यांची भेट घेऊन दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे केले. झुरंगे हे सध्या कृषी समितीवर सदस्य आहेत. जिल्हा परिषदेच्या दहा समित्या आहेत. एका वेळी एकाच समितीचे सदस्य होता येत असल्याने झुरंगे यांचा राजीनामा बुधवारीच तडकाफडकी मंजुर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे. या सभेत झुरंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांची काँग्रेसचे विश्वासू म्हणून ओळख आहे. गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. यावर्षी लोकसभा निवडणूकीत काँगे्रसने सुप्रीया सुळे यांना पाठींबा दिला होता. त्या बदल्यात हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरमधून उमेदवारी मिळावी अश्या चर्चा झाल्या होत्या. याही वेळेला हर्षवर्धन पाटीळ हे निवडणूक लढवणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडूनही उमेदवार उभा करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पाटील यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणीस यांची भेट घेतली होती. तेव्हा पासून पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अंकिता पाटील यांना स्थायी समितीचे सदस्यत्व मिळू नये यासाठी प्रयत्न करत होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचेनंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठनेते आहेत. जर पाटील यांनी कमळ हाती घेतले तर राज्यातील काँग्रेस ताकद संपुष्टात येऊन तालुक्यात भाजपाची ताकद वाढणार आहे. तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न, एमआयडीसीमध्ये येणारे नविन उद्योग, रस्त्यांची कामे, सर्वसामान्य जनतेसाठी असणा-या विविध शासकीय योजना यासाठी मदत होणार आहे. तसेच सध्या अडचणीत असलेला साखर उद्योगाला देखील मदत होईल.भाजपची महाजनादेश यात्रा येत्या २६ तारखेला इंदापूरला येणार असून यांच्या प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचे मानले जात आहे.