Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:36 PM2024-08-02T17:36:07+5:302024-08-02T17:36:59+5:30

सन १९९५ मध्ये ज्या तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती

Harshvardhan Patil should contest the assembly as an independent Workers wish will Vikas Aghadi be restarted? | Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का?

Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का?

इंदापूर : पक्षाच्या चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे पुन्हा आमदार व्हावेत, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे सन १९९५ ची तालुका विकास आघाडी पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.
    
उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हाडवैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एकमेकांना शह काटशह देण्याची एक ही संधी ते सोडत नाहीत. शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांचे सख्य असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अजित पवारांची पाटील यांच्यासमवेत सुरु असणारी राजकीय धुम्मस आत्ताच्या लोकसभा निवडणुकीआधी काही काळासाठी थांबली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसची शकले झाल्यानंतर भाजपने या निवडणुकीत मुत्सद्देगिरी दाखवून खा.सुप्रिया सुळे विरुध्द  सुनेत्रा पवार अशी लढत करण्यास भाग पाडून 'पवारां'मध्ये महाभारत घडवून आणले होते. या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचा मुद्दा धसास लावण्याचे काम हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या, भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी व हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केले होते. प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने अक्कडबाज अजित पवार दोन पावले मागे सरकले.त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी समझोता केला.अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल हे जाहिरपणे सांगण्यापर्यंत अजित पवार लवचिक झाले होते.

मात्र हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक दिवस त्यांना खाते न मिळू देणारे व एका निवडणुकीत आ.दत्तात्रय भरणे यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करणारे अजित पवार लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढल्याशिवाय रहाणार नाहीत. जागा वाटपात विद्यमान आमदारांचा मतदार संघ म्हणून इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी. आपले निष्ठावंत असणा-या आ. दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून ते जंगजंग पछाडणार हे गृहीत धरुन हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांना उमेदवारी द्यावी म्हणून भाजपवरच दबावतंत्राचा वापर करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे.
    
प्रारंभी अपक्षांचे विमान चिन्ह असणारे फ्लेक्स बोर्ड संपूर्ण तालुक्यात लावत हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील असे संकेत देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आ.दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, भाजपचे नेते माऊली चवरे यांचे फ्लेक्स झळकले. फ्लेक्स बोर्डांचेच युध्द सुरु झाले. त्यापुढची पायरी म्हणून सन १९९५ मध्ये ज्या तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या विकास आघाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिन्यात हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तारखेपर्यंत तालुक्यातील शंभर प्रमुख गावात शाखा काढण्याचे कार्यकर्त्यांचे नियोजन आहे. त्याचा शुभारंभ नुकताच पाटील यांचे जन्मगाव असणा-या बावडा येथे झाला आहे.
    
शंभर शाखा होतील का. त्या झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांचे खांदेपालट होईल का. जर झाल्यास आ. दत्तात्रय भरणे कोणती भूमिका स्वीकारतील व न झाल्यास हर्षवर्धन पाटील काय करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Harshvardhan Patil should contest the assembly as an independent Workers wish will Vikas Aghadi be restarted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.