सुधाकर बोराटे
इंदापुर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे तीन एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व माजी जिल्हा परिषद सदस्या राणी आढाव यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हर्षवर्धन पाटील समर्थकांचे पक्षांतर चर्चेचा विषय ठरला आहे.
याशिवाय अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चा भाजप गटात मोठी अस्वस्थता पसरवणारी ठरली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे. ढोले हे गेल्या अनेक वर्षांपासून पाटील यांचे अत्यंत विश्वासु म्हणुन ओळखले जातात. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातुन ते जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आले होते. लाखेवाडी ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता आहे. मागील काही दिवसापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजीतून ढोले यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतल्याचे मानले जाते.
तसेच, माजी जिल्हा परिषद सदस्या राणी आढाव या भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटात २०१२ मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनलमधुन काँग्रेसच्या तिकीटावर निवडुन आल्या होत्या. त्यांचे पती माजी सरपंच आण्णा आढाव हे हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासु मानले जातात. परंतु पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर पक्षात सन्मानाची वागणुक मिळत नसल्याची खंत आढाव यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. याच कारणामुळे दोघेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या वेटींगलिस्ट अनेकजण असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. मात्र, संबंधितांची नावे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद लिफाफ्यामध्येच ठेवली आहेत. भाजप ला धक्का देत राष्ट्रवादीने झेडपी,पंचायत समीती व नगरपरिषदेवर एकहाती सत्ता काबीज करण्याची रणनीती आखण्यास सुरवात केल्याचे संकेत आहेत.