-दुर्गेश मोरेपुणे : अजित पवारांचा त्रास नको म्हणून भाजपवासी झालेले आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून सुखाने झोप लागते, असे म्हणणारे इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची ताज्या राजकीय भूकंपामुळे झोप उडाली आहे.
हर्षवर्धन पाटील हे माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांचे पुतणे. त्यांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघ बारामतीला खेटून आहे. १९९५ मध्ये त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मगितली होती; पण ती नाकारून शरद पवार यांनी तत्कालीन आमदार गणपतराव पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बंडखोरी केली आणि निवडूनही आले. तेव्हापासून पवार घराणे आणि पाटील यांच्यातील राजकीय तेढ आजही कायम आहे. आता अजित पवारच भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने हर्षवर्धन पाटील यांची पंचाईत झाली आहे.
अपक्षांचे नेते आणि मंत्रिपदाची झूल१९९५ च्या निवडणुकांनतर सत्तेजवळ पोहोचलेल्या भाजप-सेना युतीला टेकू देणाऱ्या अपक्षांचे पाटील नेते झाले. यातून स्थापन झालेल्या सेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. पुढील निवडणुकीनंतर पुन्हा युतीचे सरकार बनणार नाही, हे स्पष्ट होताच पाटील यांनी १९९९ रोजी आघाडी सरकारला अपक्ष म्हणून पाठिंबा देत ते कॅबिनेट मंत्री झाले; मात्र राष्ट्रवादीच्या दबावानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुन्हा अपक्ष आमदारांचे सहकार्य लागल्याने पाटील यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले.
विळ्या-भोपळ्याचे सख्यपृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सहकार खाते होते. त्यावेळी कथित शिखर बँक घोटाळ्याची चौकशी लावण्यात आली. त्यावेळी अजित पवार बँकेचे अध्यक्ष होते. तेव्हापासून दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य निर्माण झाले. ते आजही कायम आहे.