मुंबई - विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना राज्यातील मुख्य विरोधी पक्षष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. सामान्य आमदारांपाठोपाठ आता दोन्ही पक्षांचे अनेक दिग्गज नेतेही पक्षाला सोडचिठ्ठी देऊ लागले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास इच्छुक नसल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील नाराज झाले असून, ते भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरूआहे. इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेच फसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील या जागेवरून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र सध्या ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, 2014 मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे विजयी झाली होते. हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आले होते. परंतु, २०१४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन यांना पराभूत केले. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदार संघावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पाटील यांनी देखील एका कार्यक्रमाला आमंत्रण देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यामुळे पाटील यांच्या पक्षांतराला उधाण आले आहे. यदा कदाचित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, इंदापूरमधून पाटील यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल. सहाजिकच राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना हे नुकसानीचेच ठरणार आहे. एकूणच राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिल्यास, हर्षवर्धन पाटील अडचणीत सापडणार आहे. तर भरणेंना नाकारले तर भरणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे.
हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:58 AM