लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यातील लढत अधिक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अन्य तालुक्यात देखील विधानसभा निवडणुकीतल पारंपरिक विरोधकच आमने-सामने येणार आहेत. जिल्ह्यात इंदापूर,आंबेगाव,पुरंदर, दौड, भोर या तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुका अधिक चुरशीच्या होतील.
पुणे जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता हळूहळू गावागावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामध्ये जिल्ह्यातील इंदापूर, आंबेगाव, दौड, पुरंदर भोर, शिरूर तालुक्यातील निवडणुका अधिक चुरशी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जाते. यामुळेच स्थानिक आमदारांकडून ग्रामपंचायत निवडणुका अधिक गांभीर्यांने घेतल्या जातात. या निवडणुका थेट कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात होते. या गावकी-भवकीच्या राजकारणात अनेक ठिकाणी स्थानिक आमदार विरुध्द पारंपारिक विरोधक आमनेसामने येणार आहेत.
---
- जिल्ह्यात ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत
-------
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हे आमने-सामने
इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विरूद्ध माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
आंबेगाव : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील विरुध्द माजी खासदार शिवाजी आढळराव
पुरंदर : आमदार संजय जगताप विरुध्द माजी मंत्री विजय शिवतारे
दौड : आमदार राहुल कुल विरुध्द माजी आमदार रमेश थोरात
भोर : आमदार संग्राम थोपटे विरूद्ध जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे
खेड : आमदार दिलीप मोहिते विरूद्ध अतुल देशमुख
अ - मावळ : आमदार सुनील शेळके विरुद्ध माजी आमदार बाळा भेगडे