BJP Harshwardhan Patil ( Marathi News ) : महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालयाने निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष भाग घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देणारे परिपत्रक मंगळवारी (दि.५) जारी केल्याने निवडणूक प्रचाराची बरीचशी भिस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सोपवणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावरील अडचणीत आणखी एक भर पडली आहे.
राज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबत विविध प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालयाने उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी परिपत्रक जारी केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, एस. बी. पाटील शैक्षणिक संकुल व बावड्याच्या एज्यकेशन सोसायटी आदी शैक्षणिक संस्थांचा कारभार पाहतात. या संस्थांमध्ये ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील महाविद्यालये व विद्यालयातील सुमारे तीनशे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, बावड्याच्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीतील दीडशे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलातील सुमारे शंभर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अशा साडेपाचशे जणांवर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराची भिस्त असते. हे सर्व जण घरोघर पत्रके वाटणे, पदयात्रांमध्ये सहभागी होणे, मतदारांचे मन वळवण्यापासून ते सभांची तयारी करण्यापर्यंतची जबाबदारी शिस्तबद्ध पार पाडत असत. पण शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत ही एक भर पडलेली आहे.