पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षसंघटनेत फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील सर्व जिल्हे तसेच मोठ्या शहरांमध्ये त्यांनी प्रदेशकडून निरिक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरिक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रात दौरा करून त्याचा सविस्तर अहवाल द्यायचा असून त्यानंतर तेथील संघटनात्मक बदलाचा निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईत टिळक भवन या पक्ष कार्यालयात सपकाळ यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची, काही प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये पक्ष संघटनेवर चर्चा झाली. मंडल स्तरापासून ते प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज यात पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संघटना क्षीण झाल्यामुळेच त्याचा निवडणुकीवर परिणाम होतो. मतदारांबरोबर पक्षसंघटनेचा संपर्कच राहिलेला नाही, पक्ष पदाधिकारी कामांपेक्षाही स्वत:चा तामझाम सांभाळण्यातच दंग असतो. ‘सर्वांना बरोबर घेत काम’ या सुत्राचा विसर पडल्यासारखे वातावरण आहे असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळेच बालेकिल्ला समजले जाणाऱ्या जिल्ह्यातही पक्षाला चांगले वातावरण नसल्याचे सांगण्यात आले.
यावर जिल्हानिहाय निरीक्षक नियुक्त करून संघटनेची सद्यस्थिती जाणून घेण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे जिल्हानिहाय निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. या निरिक्षकांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन पक्षसंघटनेच्या तेथील स्थितीची माहिती घ्यावी. तळातील कार्यकर्ते, माजी पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करावी व आपला निरिक्षणात्मक अहवाल प्रदेशला सादर करावा असे ठरले.
पुण्यातून या बैठकीला माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे उपस्थित होते. त्यांच्याकडेही राज्यातील काही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सपकाळ यांनी स्वत: सर्वांना काय करायचे, माहिती कशी घ्यायची, कशाची घ्यायची याबाबत सांगितले असल्याचे समजले. दौरा करून आपापल्या जिल्ह्याचा अहवाल सादर करावा असे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा अहवाल आल्यानंतरच बदलाचे निर्णय घेतले जातील व त्याप्रमाणे कळवले जाईल अशी चर्चा आहे.