पुणे : पिछाडीवर असतानाही कोणत्याही दडपण न घेता उत्कृष्ट अष्टपैलू खेळ करीत हरियाणा स्टीलर्स संघाने पाटणा पायरेट्स संघाला ४२-३६ असे हरविले. प्रो कबड्डी लीगच्या या सामन्यात मध्यंतराला पाटणा संघाकडे १७-१६ अशी केवळ एक गुणाची नाममात्र आघाडी होती
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन सभागृहात या स्पर्धेत हरियाणा संघाने १६ सामन्यात १३वा विजय नोंदवला. यामध्ये हरयाणाच्या शिवम पटारे याने ११, मोहम्मदरेजा शादलूइने ९ आणि संजय याने ५ गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, पाटणा संघाकडून देवांकने १३ गुण मिळवले.
हरियाणा व पाटणा या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडी घेण्यासाठी चुरस होती. सामन्याच्या सोळाव्या मिनिटाला पाटणा संघाने हरियाणावर पहिला लोण चढविला. उत्तरार्धात सुरुवातीला पुन्हा पाटणा संघ लोण नोंदवण्याची संधी मिळाली होती मात्र हरियाणाच्या खेळाडूंनी त्यांना या संधीपासून वंचित ठेवले.
शेवटची दहा मिनिटे बाकी असताना हरियाणा संघाने ३०-२९ अशी एक गुणाची आघाडी घेतली होती. पाच मिनिटे बाकी असताना हरियाणा संघाने पाटणा संघावर लोण चढवीत ३७-३० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
पाटणा संघाचा कर्णधार अंकित कुमार याने पकडी मधील गुणांचे अर्धशतक पूर्ण केले. त्यांचा चढाईपटू देवांक याने या मोसमातील २०० गुणांचा टप्पा ओलांडला.
देवांक व अंकित यांनी पाटणा संघाकडून चिवट लढत दिली. हरियाणा संघाकडून शिवम पात्रे विजयाचा शिल्पकार ठरला त्याने गुणांची नोंद केली. मोहम्मद रेझा, विनय कुमार व संजय कुमार यांनी त्याला चांगली साथ दिली.
तमिळ थलाईवाजचा गुजरात संघावर विजय
सांघिक कौशल्याच्या जोरावर तमिळ थलाईवाजने गुजरात जायंटस संघावर ४०-२७ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीगमध्ये आपले आव्हान कायम राखले. मध्यंतराला तमिळ संघाकडे १९-८ अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. तमिळ थलाईवाज संघाने सुरुवातीपासूनच चढाया व पकडी या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली सामन्याच्या पंधराव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण चढवीत १४-६ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मध्यंतराला त्यांच्याकडे १९-८ अशी आघाडी होती.