पुणे : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे पुन्हा ईडीने छापा टाकला. सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तर, दुसरीकडे मुश्रीफांचे व्यावसायिक भागिदार चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील घरावर आणि ऑफिसवरही ईडीने छापेमारी केली आहे.
माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरी यापूर्वीही आयकर आणि ईडीचे छापे पडले आहेत.त्यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.
गडहिंग्लज शहर बंदचा निर्णय हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीने छापा टाकला. त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार आहे, याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज बंद करण्याचा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. घरामध्ये एके 47 रायफली तैनात केलेले पोलिस लावून अशा पद्धतीची दहशत माजवून एका चांगले काम करणाऱ्या नेत्याला असा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने घातलेले हे ईडीचे छापे आहे, त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांना उद्योजकांना सर्वांनी आजच्या दिवशी गडहिंग्लज कडकडीत बंद पाळण्यात यावा, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे मुरगूडमधील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.