नम्रता फडणीस/प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : बसच्या प्रवासापासून आॅफिस, हॉटेल, मॉल, बागा, थिएटर, रस्ता अशा ठिकाणी ‘ती’ला आरपार भेदून जाणार्या नजरा... कधी स्पर्शातून, नजरेतून, तर कधी भाषेतून डोकावणारी अश्लीलता... ‘वॉच’ ठेवून केला जाणारा पाठलाग... छेडछाड, अतिप्रसंगाचे कोणालाही न सांगता येणारे क्षण... अशा अनेक प्रकारांतून ती मुकेपणाने लैंगिक शोषण सहन करीत असते. पण आता मी गप्प बसणार नाही, कोणालाही सांगायला घाबरणार नाही, हेच ‘मीटू’ या सोशल मीडियावरील चळवळीतून ‘ती’ने ठामपणे अधोरेखित केले आहे. सामान्य स्त्रियांपासून तरुणी, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. प्रगत म्हणवणार्या एकविसाव्या शतकात स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि मानसिकता अद्याप बदललेली नाही. त्यामुळेच स्त्रीला पावलोपावली लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण, निमशहरी, शहरी भागातील प्रत्येक स्तरातील स्त्रीला आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आलेला असतो. मात्र ‘लोक काय म्हणतील’ किंवा ‘माझ्याबद्दल काय विचार करतील,’ या भीतीने महिला अत्याचाराबद्दल बोलायला धजावत नाहीत. मात्र, या परिस्थितीत बदल घडावा, सकारात्मक प्रतिसाद मिळावा, या हेतूने सोशल मीडियावर आॅक्टोबर महिन्यापासून ‘हॅशटॅग मीटू’ या चळवळीने चांगलाच जोर धरला आहे. कधीतरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले असल्यास महिलांनी ‘हॅशटॅग मीटू’ असे स्टेटस आपल्या फेसबुक वॉलवर ठेवावे, अशी कल्पना रुजली आहे. सर्व स्तरांतून या चळवळीला जोरदार पाठिंबा मिळत आहे.अनेक जणींनी ‘हॅशटॅग मीटू’ हे स्टेटस आपलेसे करत लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या चळवळीत मोलाचा वाटा उचलला आहे. केवळ महिलाच नव्हे, तर विविध स्तरांतून पुरुषांनीही पाठिंबा दर्शवला आहे. ‘अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा प्रत्येकीचा हक्क आहे,’ ‘दर वेळी स्त्री आहे म्हणून मी का गप्प राहायचे,’ ‘महिला कुठेच सुरक्षित नाही, ही परिस्थिती कधी बदलणार?’ अशा विविध प्रतिक्रियांमधून महिलांनी लैंगिक प्रश्नाला वाचा फोडली आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. लैंगिक अत्याचाराविरोधात बोलण्याचा प्रत्येक स्त्रीला हक्क आहे. त्यामुळेच ‘हॅशटॅग मीटू’ ही चळवळ परिवर्तनाकडे टाकलेले एक पाऊल आहे. यातून अनेकांना याचे गांभीर्य कळू शकेल व प्रश्न लगेच सुटणारा नसला तरी किमान उपाय शोधण्याला सुरुवात होईल, अशी भावना तरुणींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कायदा काय सांगतो? : ३ महिन्यांची शिक्षा व दंड होऊ शकतोमहिलेकडे एकटक पाहत राहणे यातून महिलांमध्ये जर काही सेकंदासाठीही अस्वस्थतेची भावना आली तर तो गुन्हा ठरू शकतो. सार्वजनिक ठिकाणी महिलेला उद्देशून अश्लील गाणी किंवा कमेंट्स केल्यास संबंधित व्यक्तीला भारतीय दंडविधान कलम २९४ नुसार तीन महिन्यांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.महिलेचा पाठलाग करणे हादेखील गुन्हा आहे. तिला पूर्वकल्पना नसताना जर तिचा कुणी पाठलाग करत असेल तर हा लैंगिक शोषणाचाच एक प्रकार समजला जातो. संबंधित व्यक्तीला भारतीय दंडविधान कलम ३५४ (ड) प्रमाणे तीन ते पाच वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.एखादी व्यक्ती लैंगिक सुखाची मागणी करीत असेल आणि महिलेचा त्याला नकार असेल तर तो भारतीय दंडविधान कलम ३५४ (अ) नुसार गुन्हा ठरू शकतो. संबंधित व्यक्तीला एक ते तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. जर याकरिता महिलेला शारीरिकदृष्ट्या इजा करून धमकावले आणि त्यातून महिलेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्यास भारतीय दंडविधान कलम ५०३ नुसार दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. एखाद्या वरिष्ठाने जर कामाचा फायदा करून देणे, पगारवाढ देणे आणि पदोन्नती करणे या गोष्टींसाठी लैंगिक सुखाची मागणी केली, तर कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण या २०१३ च्या कायद्यानुसार हा गुन्हा ठरू शकतो. प्रत्येक संघटनांनी यासाठी दहा कर्मचार्यांची एक अंतर्गत समिती गठित करणे आवश्यक आहे. तिथे महिला आपली तक्रार नोंदवू शकतात. महिलेच्या संमतीशिवाय तिची छायाचित्रे घेणे आणि ती स्वत:च्या फायद्यासाठी दुसर्यांना शेअर करणे हादेखील भारतीय दंडविधान ३५४ (क) नुसार गुन्हा ठरू शकतो. संबंधित व्यक्तीला एक ते तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ती व्यक्ती जर दुसर्यांना दोषी आढळली तर त्याला तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. महिलेच्या छायाचित्रात फेरफार करून महिलेची बदनामी करण्याच्या हेतूने जर ते सोशल मीडियावर टाकले तर कलम ४९९ नुसार तो गुन्हा ठरू शकतो. संबंधित व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. कोणत्याही महिलेला जर अशा कोणत्याही प्रकारांना सामोरे जावे लागले असेल तर त्या महिलेने गुन्हेगारी संबंधित केस हाताळणार्या वकिलांशी संपर्क साधावा किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. जेव्हा महिला लैंगिक शोषणाविषयीचा अर्ज दाखल करते तेव्हा तिचे म्हणणे तिला समजेल अशाच भाषेत रेकॉर्ड व्हायला पाहिजे. हे शक्य नसेल तर तिचे म्हणणे अनुवादित करायला हवे किंवा संबंधित अधिकार्याने तिला समजावून सांगायला हवे.
दुचाकीला एका गाडीची टक्कर झाल्याने आमचे भांडण सुरू झाले. लोकांची गर्दी जमा झाली. त्या गर्दीत लोकांनी इकडेतिकडे हात लावण्याची एकही संधी सोडली नाही. घरातून बाहेर पडल्यावर रोज महिलांना पुरुषांच्या वाईट नजरा, अश्लील कमेंट्स यांसारख्या अशा अनेक लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते. ‘हॅशटॅग मीटू’ची चळवळ सोशल मीडियावर उभी राहिली आहे, याचा आनंद आहे. महिलांनी बोलण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.- राधिका शर्मा
केवळ शारीरिक स्पर्श करूनच शोषण होते असे नव्हे, तर त्यासाठी एक नजरही पुरेशी असते. सार्वजनिक ठिकाणी हे प्रकार सातत्याने घडतच असतात. पण कुणालाही सांगितले तरी त्याकडे डोळेझाकच केली जाते. सार्वजनिकपेक्षाही सोशल मीडियावर होणारे शोषण हे जास्त घातक आहे. समोरची व्यक्ती विशेषत: अभिनेत्रींच्या फोटोवर लैंगिक भावनेच्या दृष्टिकोनातून ट्रोलिंग केले जाते. ती व्यक्ती समोर आपल्याला भेटणार नसते, हे माहीत असते. मग अधिकारातून बिनधास्तपणे अश्लील कमेंट टाकल्या जातात. शारीरिक शोषणापेक्षाही आभासी शोषण यावर आवाज उठवला गेला पाहिजे. अभिनेत्रींसाठी हा रोजचा अनुभव आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. ‘हॅशटॅग मीटू’ व्यासपीठाच्या माध्यमातून यावरही बोलल गेले पाहिजे.- स्पृहा जोशी, अभिनेत्री
‘हॅशटॅग मीटू’ चळवळ कशी सुरू झाली?अमेरिकन अभिनेत्री अल्यासा मिलानो हिने सोशल मीडियावर ही चळवळ सुरू केली. सार्वजनिक ठिकाणी ज्या महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे त्यांनी आपले अनुभव ‘हॅशटॅग मीटू’ या नावाने शेअर करावेत, असे तिने आवाहन केले होते. या मीटू चळवळीमध्ये जगभरातील ४.७ अब्ज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. जवळपास १२ अब्ज पोस्ट, कमेंट्स आणि प्रतिक्रियांमधून चळवळीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
आपल्याबाबतीत काहीतरी चुकीचे घडत आहे, हे महिलांना समजते, कळत पण असते. पण महिलेकडे वाईट नजरेने पाहणे, अश्लील विनोद किंवा कमेंट्स करणे, सोशल मीडियावर हा एक गुन्हा ठरू शकतो, याबाबत अद्यापही महिलांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. त्यामुळे मूकपणे महिला सर्व गोष्टी सहन करत राहतात. सोशल मीडियावरदेखील महिलांची फसवणूक होत आहे. मात्र त्यांना ही गोष्ट उशिरा कळते. यासंदर्भात महिलांनाच कायद्याची आणि हक्काची जाणीव होणे आवश्यक आहे. - राधिका फडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम सेल