पुणे : मिळकत करातील ४० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी, ढीगभर कागदपत्रांची मागणी तसेच २५ रुपये शुल्क सुद्धा. हे योग्य नाही असे सांगत आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी महापालिका प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले.
शहरातील मिळकतधारकांकडून वाढीव मिळकत कर घेताना घाई आणि परत देताना मात्र दिरंगाई व आता ही सवलत मिळविण्यासाठी जाचक अटी, त्यात २५ रुपये शुल्क असा आरोप आम आदमी पक्षाकडून यावेळी करण्यात आला. सोपी मिळकत कर प्रणाली बदलून क्लिष्ट करण्याचा आणि अनेकांना मिळकत कराच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचा पुणे महापालिकेचा हा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कष्टाचा पैसा प्रशासनाला परत द्यायचा आहे की नाही का असा प्रश्न आता पडत आहे. फक्त नागरिकांसाठी काही तरी केल्याचा या प्रशासनाकडून आव आणला जात आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. तसेच २०१९ नंतर कर आकारणी झालेल्या मिळकतदारांना ४० % मिळकत कर सवलतीसाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याचा आदेश रद्द करावा. व २०१९ पासून घेतलेली वाढीव मिळकत कर रक्कम विनाअडथळा एकवट परत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ अभिजित मोरे, एकनाथ ढोले, किरण कद्रे, सेंथिल अय्यर, सुनीता काळे, वैशाली डोंगरे, साहील परदेशी, शेखर ढगे, रोहन रोकडे, अविनाश भाकरे, संजय भूमकर,अमित म्हस्के, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, मिताली वडावराव आदी उपस्थित होते.