पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग तिसर्यांदा विजय मिळवित हॅटट्रिक केली. आढळराव यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी विजय मिळविला. आढळराव यांना ६, ४२, ८२८ मते मिळाली. तर देवत्त निकम यांना ३, ४१, ३७५ मते मिळाली. शिवसेनेतून ऐनवेळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत जाऊन लढणारे अशोक खांडेभराड यांना केवळ ३६, ४३१ मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे सोपानराव निकम यांना १६, ६५३ मते मिळाली. पहिल्या ३ आघाडीपर्यंत आढळराव आणि निकम यांच्यात मतांची आघाडी-पिछाडी होत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती. मात्र चौथ्या फेरीपासून आढळरावांनी आघाडी घेतली ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. ६ व्या फेरीपर्यंत आढळराव ५० हजाराहून अधिक मतांनी पुढे गेल्याने राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा दिसून आली. अनेकांनी तेथून काढता पाय घेतला. मोजणीच्या ठिकाणी देवदत्त निकम एकटेच बसल्याचे चित्र होते. याच काळात आढळराव येताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. पंधराव्या फेरीपर्यंत आढळराव दीड लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर गेल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणा देण्यास सुरूवात केली. शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली आणि हडपसर या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी पाच ठिकाणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. मात्र, आढळराव यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या निकम यांना उमेदवारी देण्यात आली. पाचही आमदारांवर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एखाद्या मतदारसंघात कमी मताधिक्य मिळाल्यास कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. मात्र, मतदारसंघातील सहाही मतदारसंघात आढळराव यांनीच मोठी आघाडी मिळविली. मोदीलाटेमुळे गेल्या वेळीपेक्षा दीडपटीहून अधिक मते त्यांना मिळाली.
आढळराव यांची हॅट्ट्रिक
By admin | Published: May 17, 2014 6:00 AM