पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत विटीदांडू आणि गोट्या खेळत काँग्रेसच्या शहर शाखेने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. टिळक स्मारक चौकात बुधवारी दुपारी हे आंदोलन झाले. प्रतिकात्मक विटीदांडू व गोट्या खेळून भाजपाचा निषेध करण्यात आला.
शिवरकर म्हणाले, भाजपाने देशच खड्ड्यात घातला आहे, पुणे न घालतील तरच नवल. त्यांंना कामे करता येत नाही. पुणेकरांनी चांगली संधी दिली, मात्र ते शहर भकास करत चालले आहेत.
बागवे म्हणाले, काँग्रेसने सत्तेचा वापर सामान्यांचे जगणे सुधारावे म्हणून केला. पुण्यातील आत्ता दिसत आहेत ती काँग्रेसने केलेल्या विकासाची उदाहरणे आहेत. यांच्या महापालिकेतील सत्ताकाळात फक्त ठेकेदारांचीच चलती आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी यांनी एकही काम सोडलेले नाही.
''शहराचे शिल्पकार म्हणवून घेताना देवेंद्र फडणवीस यांना काहीच कसे वाटत नाही. विकासकाम केल्याचे एकतरी ऊदाहरण त्यांनी दाखवावे. आम्ही चंद्रकांत पाटील यांंना लवकरच एक मोठा चष्मा भेट देणार आहोत. त्यात पाहून तरी त्यांना महापालिकेतील सत्ताधार्यांनी शहर कसे भकास केले आहे ते दिसेल.अशी टीका संयोजक बालगुडे यांनीही भाजपवर केली. ''
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड, प्रदेश सचिव व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संजय बालगुडे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी मिळून विटी दांडू व गोट्यांचा एक एक डाव रंगवला. भाजपाच्या विरोधातील घोषणा देण्यात आल्या.