लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : जनतेने आमच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे म्हणजे आम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे लागेल, असे मत पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. दौंड येथे मोफत महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जानकर बोलत होते. या शिबिरात दिवसभरात २१ हजार ८९९ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दौंड तालुक्यातील विकासासाठी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून योग्य ते प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही देखील सामाजिक बांधिलकी आहे. त्यातूनच दौंड येथे दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. मात्र हा कारखाना राज्यात आदर्श साखर कारखाना म्हणून गौरविला जाईल, या पद्धतीने कारखान्याची मी मदत करणार आहे, असे जानकर म्हणाले.ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले की, कुलांच्या माध्यमातून हे तिसरे शिबिर आहे. याचा फायदा आरोग्याच्या दृष्टीने जनतेला होत आहे. नगराध्यक्षा शीतल कटारिया, माजी आमदार रंजना कुल, आरोग्य संचालक हनुमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तहसीलदार विवेक साळुंके, समादेशक श्रीकांत पाठक, गटविकास अधिकारी संतोष हराळे उपस्थित होते.महाराष्ट्र शासन, स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल स्मृती न्यास, राहुल कुल मित्र मंड, महात्मा फुले जीवनदायी योजना, दौंड रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.राज्यात ३८५ कोटी रुपये चॅरिटी निधी उपलब्ध केला आहे. त्यानुसार दौंड तालुक्याला या निधीचा मोठा फायदा झाला आहे. - ओमप्रकाश शेटे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख दौंड तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांबरोबरीने आरोग्य देखील महत्वाचे आहे. म्हणूनच दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिराला तालुक्यातील जनता विविध संस्था, यांचे सहकार्य मिळाले. - राहुल कुल, आमदार, दौंड
...तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे लागेल
By admin | Published: May 30, 2017 2:10 AM