पुणे : आपल्याला कावळा म्हटलं की काळा हे समीकरण माहिती आहे. पण कधी पांढरा कावळा पाहिला आहे का ? तर हो पांढरा कावळा देखील आहे. त्याचे नुकतेच दर्शन पर्वती परिसरात झाले आहे. ही प्रजाती दुर्मिळच आहे. या प्रकाराला ल्युसिस्टिक (leucistic) अल्बिनिझम असे म्हटले जाते. माणसांना होणारा कोड आपल्याला माहित आहे. पण प्राणी, पक्ष्यांमध्येही हा कोड दिसून येत असतो. पर्वत परिसरात राहणारे निसर्ग अभ्यासक लोकेश बापट यांच्या हिरव्या गॅलरीत हा कावळा आला होता. त्यांनी याची नोंद केली आहे. त्यांनी त्याचे फोटो देखील काढले आहेत. त्यांनी यापुर्वी पांढरी सांळुकी पाहिली होती. त्यामुळे त्यांना हा पांढरा कावळा ओळखता आला.
याबाबत पक्षीतज्ज्ञांना विचारले तर ते म्हणाले, पक्ष्यांमधील हा एक त्वचाविकार आहे. शरीरामध्ये मेलॅनिन द्रव्य निर्माण होत असतात, त्यासाठी एंजाइम लागतात. पण त्या एंजाइमच्या कमतरतेमुळे त्वचा पांढरी व्हायला सुरुवात होते. खरंतर हा एक त्वचारोगाचा प्रकार आहे. माणसांमध्ये देखील असे पहायला मिळते. आपण त्याला कोड म्हणतो. तसेच प्राणी, पक्ष्यांमध्येही हा कोड असतो. त्याला शास्रीय अल्बिनो असे म्हटले जाते. यामध्ये सर्वच पक्ष्यांचा समावेश होत असतो. पक्षी, प्राण्यात असा रंग येतो...
आपल्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये देखील पांढरा वाघ आहे. खरंतर पांढरे पक्षी, प्राणी ही वेगळी प्रजाती नसते, तर त्यांच्या शरीरात काही द्रव्यांची कमतरता निर्माण झाली की असा रंग येतो. सापामध्ये देखील असे पहायला मिळते. गतवर्षी सर्पमित्र डॉ. आशिष मेरूकर यांना सापाचे एक पिल्लू आढळले होते.
का येतो पांढरा रंग?
शरीरातील रंगद्रव्य कमी झाले असले की मग पांढरा रंग होतो. गेल्या वर्षी शंकरशेट रोडवर देखील पांढरी सांळुकी पहायला मिळाली होती. याला पार्शियल अल्बिनिझम असे म्हणतात. साळुंकीच्या डोक्याकडील भागात रंगद्रव्य कमी झाल्याने ती अर्धी पांढरी दिसत होती. हे पक्षी दिसायला वेगळे दिसतात. या पक्ष्यांना कधी कधी डोळ्यांना कमी दिसत असते. मग अशा पक्ष्यांची इतर पक्षी शिकार करतात. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ . सतीश पांडे यांनी तर काळा घुबड देखील पाहिला आहे. लाल रंगाची कोकिळ पाहिली आहे.