लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात वेगवेगळ्या गुन्ह्यात तब्बल ४६ आरोपी फरार असून, गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यात अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर काही आरोपी पोलिसांना मिळून येत नाहीत. त्यांची यादी प्रत्येक पोलीस ठाण्यातून तयार करून पोलीस आयुक्तालयातील एमओबी शाखेला पाठविली जाते. एमओबी शाखा अशा पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करीत असते. ही यादी दर महिन्याला अद्ययावत केली जाते. जोपर्यंत आरोपी सापडत नाही, तोपर्यंत अशा गुन्हेगारांचा या यादीत समावेश असतो. गुन्हेगार सापडल्यानंतर मग त्याचे नाव यादीतून कमी केले जाते. कोणताही गुन्हेगार सापडला नाही तर त्याचे नाव फरार म्हणून ३० वर्षे कायम ठेवले जाते.
फरार आणि पाहिजे असलेल्या गुन्हेगारांच्या शोधासाठी अनेकदा स्वतंत्र पथक नेमून त्यांचा शोध घेतला जातो. अशा पथकाकडून अनेकदा अनेक वर्षे फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेतला गेला आहे. अगदी ४० वर्षांपूर्वीचे गुन्हेगारही त्यातून सापडले आहेत.
गुन्हा केल्यानंतर अनेक गुन्हेगार पळून जातात. अशा गुन्हेगारांना पाहिजे असलेले गुन्हेगार म्हणून ओळखले जाते. पुणे शहरात विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या अशा गुन्हेगारांची संख्या जवळपास अडीच हजारांपर्यंत आहे.
अनेकदा गुन्हेगार सापडत नाही किंवा दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर तो न्यायालयातील तारखांना हजर राहत नाही. अशा गुन्हेगारांबाबत पोलीस ठाण्यातून न्यायालयाला फरार म्हणून घोषित करण्याची विनंती केली जाते. न्यायालय वॉरंट जारी करते. तरीही गुन्हेगार हजर राहिला नाही, तर त्याला फरार घोषित करते. फरार घोषित केल्यानंतर अनेकदा अशा गुन्हेगारांची मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई केली जाते.
शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेकडून अशा फरार आणि पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचा सातत्याने शोध घेतला जातो.
खडकमध्ये सर्वाधिक १५ फरार
एमओबीमार्फत सातत्याने फरार गुन्हेगारांची यादी जारी केली जाते. सध्या खडक पोलीस ठाण्यातील सर्वाधिक १५ गुन्हेगारांचा या यादीत समावेश आहे.