लोकमत न्यूज नेटवर्कमांजरी : मांजरी येथील असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचा शेतमाल असलेला हा उपबाजार शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे या बाजारामध्ये कोणी शेतकरी शेतमाल विक्री करण्यास येत नसून या राज्यभरात पुकारलेल्या संपाला हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, शेवाळवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, नायगाव, कोलवडी, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा, वडकी, उरूळी, फुरसुंगी यासह आदी गावांतील शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे. मांजरी उपबाजारात काही किरकोळ हातविक्री करणारे ग्राहक शेतमाल घेण्यासाठी येत असले तरी शेतकरी शेतमाल विक्रीस आणत नसल्याने मोकळ्या हाताने ग्राहकांना माघारी परतावे लागत आहे. भेंडीसारख्या मालाला किलोला २५० ते ३०० रुपये भाव तर टोमॅटोला किलोला ५० रुपये किलोला भाव देण्यास किरकोळ हातविक्री करणारे ग्राहक तयार आहेत. परंतु मालच मिळत नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हडपसर पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला आहे. परंतु दोन दिवस झाले शेती मालच येत नसल्याने अजूनपर्यंत कोणतीही हिंसक घटना व अनुचित प्रकार घडला नाही, असे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु, मार्केटमध्ये संपाच्या कालावधीत शेतमाल आल्यास हिंसक वळण लागू शकते, त्या भीतीने शेतमाल आणणार कसा व ग्राहक शेतमाल नेणार कसा, या भीतीने उद्यापासून कोणीच या ठिकाणी फिरकणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
हवेली बाजार समितीत शुकशुकाट
By admin | Published: June 03, 2017 2:42 AM