कल्याणराव आवताडे -पुणे : सिंहगड रस्त्यावरील असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्याचे पुणे शहर आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असून हवेली तालुक्यातील १७ गावे ही पुणे शहर पोलीस दलात येण्याची शक्यता आहे. हवेली पोलीस ठाण्यासाठी नांदेड सिटी येथे १५ गुंठे जागाही उपलब्ध करण्यात आली आहे.
शहरालगत असणाऱ्या गावांत वाढत्या लोकसंख्येचा ताण वाढतो आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. लोणीकाळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्याबरोबरच हवेली पोलीस ठाण्याचा समावेश करण्याचा प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
हवेली पोलीस ठाण्यांतर्गत नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे आदी १७ गावांचा समावेश असला तरी यातील किती गावे हि नव्याने पुणे आयुक्तालयात येणार हे गुलदस्त्यात असले तरी हि गावे शहरालगत असून या गावांचे शहरीकरण होत आहे. स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून अनेक नोकरदारांनी या ठिकाणी फ्लॅट घेतले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यांची समस्या, वाहतुकीची समस्या निर्माण होत असून या भागांचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत आहे. सिंहगड किल्ला,खडकवासला धरण आदी पर्यटन क्षेत्र असल्याने परिसरात पर्यटकांची संख्या अधिक असते. बऱ्याचदा गुन्हेगार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरार होतात. यावेळी तपास कामात शहर पोलिसांना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर हवेली पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस दलाला जोडल्यास गावांच्या विकासाबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. पुणे शहराचा विस्तार पाहता आणखी एका परिमंडळाची आवश्यकता असून शहर पोलीस दलातील विभागाची फेररचना करण्यात येणार असल्याचे समजते. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ग्रामीण पोलीस दलात समावेश असणारे हवेली पोलीस ठाणे हे अभिरुची मॉल समोर असले तरी लवकरच हवेली पोलीस ठाणे हे नांदेड सिटी येथील प्रशस्त जागेत हलविण्यात येणार आहे.