लोणी काळभोर: हवेली तहसील कार्यालयाला कोरोनाने विळखा घातला असून फक्त तीन अव्वल कारकून व दोन महसूल सहाय्यक यांचे खांद्यावर संपूर्ण तहसीलचे काम सुरू आहे. कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित होत असून येथील बाधित शिपाई गेल्या १० दिवसांपासून अत्यवस्थ असल्याने येथील कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. हवेली तहसील कार्यालयातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे.
तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना कोरोना झाल्याने येथील कर्मचारी वर्ग धास्तावला आहे. येथील कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अनेकदा उपाययोजना करुनही येथील संगणक चालक व खाजगी सहाय्यकांनाही कोरोनाने घेरले. तर अव्वल कारकून व महसूल सहाय्यक विलगीकरणात असल्याने संपूर्ण तहसील कार्यालयाची जबाबदारी ३ अव्वल कारकून व २ महसूल सहाय्यक यांच्यावर आली आहे. यामुळे हवेली तहसील कार्यालयाचे प्रशासन कोरोनापुढे हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे येथील दोन्ही तहसीलदार कोरोना संक्रमणातून बाहेर आल्याने त्यांनी कामकाजही सुरू केल्याने प्रशासकीय कामांना सुरुवात झाली आहे. मात्र अपु-या कर्मचारी संख्येमुळे त्यांचे कामावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.
हवेली तहसील कार्यालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच अभिलेख कक्ष ( रेकॉर्ड रुम ) बंद ठेवला असून येथे विनाकारण फिरणा-यांना अटकाव केला आहे. कोरोना संक्रमणाच्या भितीमुळे याठिकाणी कर्मचारीही येण्यास तयार नाहीत. मात्र वरिष्ठांच्या कार्यालयीन आदेशामुळे येथील कार्यविवरण मात्र कमी कर्मचा-यांच्या उपस्थितीत धिम्या गतीने सुरू आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी कोव्हिड संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी येथील शिपाई व कर्मचा-यांना आठवड्यातील दिवस विभागून देण्याविषयी सूचना दिल्या आहेत.
विजयकुमार ( चोबे, अप्पर तहसीलदार हवेली ) यांनी सांगितले कि, कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये कोव्हिड बाधितांची संख्या वाढतच असल्याने या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरू आहेत. कार्यालय पुर्णपणे सॅनिटाईझ केले आहे. बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचा-यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण अथवा औषधोपचार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.