रांजणगाव सांडस: राज्यात सुरु असलेले कोरोनाचे संकट ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना कोरोनाने हिरावून नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोरोनामुळे शिरसगाव काटा येथे पाच दिवसाच्या अंतराने बाप लेकाचा मृत्यू झाला आहे.
शिरसगाव काटा येथे प्रदीप श्रीरंग जाधव यास कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती खालावल्याने त्याला शिरूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. यानंतर त्याचे वडील श्रीरंग जाधव यांना ही मुलाच्या मृत्युचा जबर धक्का बसल्याने पाच दिवसांच्या अंतराने त्यांचे राहत्या घरी निधन झाले.
दुसऱ्या घटनेत शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील पोपट ज्ञानदेव जगताप यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी आई वच्छलाबाई ज्ञानदेव जगताप यांचाही दुर्दैवी मुत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. पोपट जगताप शेतीच्या कामासाठी धावपळ करत असताना कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला .पोपट जगताप यांच्यावरती घरातील सर्व कौटुंबिक जबाबदारी होती. पण घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आईसुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकल्या होत्या. मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत. त्यांचा अंत्यविधी होण्याअगोदरच आईने आपला प्राण सोडला.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात वाढलेले रुग्ण तसेच अचानक तरुण व घरातील कर्त्या पुरुषांचे निधन होणे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कोरोना आजाराचा मोठा संसर्ग झाला आहे. एप्रिल महिना ते आतापर्यंत या भागात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.