पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बससेवेची हद्द विस्तारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नव्याने अनेक मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न असून त्यासाठी अतिरिक्त निधीसाठी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे शहरांतर्गत एकात्मिक वाहतुक धोरणाच्याअनुषंगाने पुणे मेट्रो, स्मार्ट सिटीकडूनही पीएमपीला निधीचा हातभार हवा आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी पीएमपीच्या नियोजन योजनांसह विविध मागण्या विभागीय आयुक्त व पुणे युनिफाईड मेट्रो पोलिटन ट्रान्सपोर्ट अॅथोरिटी (पुमटा) कडे केल्या आहेत. ‘पीएमपीआरडीए’चे क्षेत्र सुमारे सात हजार चौरस किलोमीटर एवढे आहे. हा भाग पुणे व पिंपरी चिंचवडशी जोडण्यासाठी विविध भागात बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने काही मार्ग १२ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. शिक्रापुर, चऱ्होली, वडगावशिंदे, मांजरी खुर्द, केसनंद, चांदे, नांदे, किरकिटवाडी, येवलेवाडी, हांडेवाडे, पनावळे आदी भागात बससेवा सुधारण्याची गरज असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. तसेच चाकण, तळेगवा दाभाडे, तळेवाडी सॉफ्टवेअर पार्क, पिरंगुट, जेजुरी, उरळी कांचन, सणसवाडी, रांजणगाव व हिंजवडी या औद्योगिक परिसरातही बससेवा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे जगताप नमुद केले आहे.
बससेवाचा विस्तार करण्यासाठी आळंदी, चाकण एमआयडीसी, रांजणगाव, वाघोली, सासवड, डोणजे किंवा धायरी, उरळी कांचन व कापुरहोळ यांसह, पौड, कामशेत, तळेगाव दाभाडे आदी भागात आगारांची गरज आहे. यासाठी जागा आरक्षित करून पीएमपीला ‘व्हायबिलिटी गॅप फंडीग’सह नियोजन करण्याची विनंती केली आहे. पीएमपीकडून मेट्रोकडून तयार केलेल्या फिडर मार्गावर सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक बससाठी आर्थिक सहाय्य व ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ महामेट्रोकडून मिळावे, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली आहे.
--------------------------------
डेक्कन येथे ‘शरद स्मार्ट हब’
वाहतुकीमधील प्रगती, नवीन पर्याय व वाहतुक वाढीसाठी स्मार्ट हब फॉर अॅटोमोबाईल रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट हब (शरद स्मार्ट हब) डेक्कन जिमखान येथे स्मार्ट सिटीच्या सहकार्याने सुरू केले जाणार आहे. वाहतुक सुसूत्रीकरणासाठी पीएमपीकडून पुढाकार घेतला जाणार आहे.
----------