धनकवडी : राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर असलेल्या प्रशस्त फुटपाथवर फेरीवालांनी बस्तान मांडले आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या गाईडलाईननुसार महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रशस्त फुटपाथवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे.
महापालिकेचा पथ विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणाचा विळखा वाढत असून यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. सातारा रस्ता पुनर्विकासाचे काम सुरू करताना अर्बन स्ट्रीट डिजाईन नुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रशस्त पदपथ, पादचाºयांनासाठी बैठक व्यवस्था, आकर्षक झाडी, स्वतंत्र सायकल ट्रँक अशी सुंदर रचना करण्यात आलेली होती.मात्र पुनर्विकासाच्या कामात होत असलेली दिरंगाई आणि अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष यामुळे फेरीवाल्यांनी या परिसरात बस्तान बसविले आहे.
दक्षिण उपनगरामधील कात्रज हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातून पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात.दरवर्षी यामध्ये वाढ होत असते. मागील महिन्यात दोन दिवसांत तीस हजार पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. अलोट गर्दीमुळे कात्रज प्राणी संग्रहालय चौक प्रभावित होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत. अपुरी पार्किंग व्यवस्था, फेरीवाल्यांचे अतिक्रमण या सर्वच गोष्टींचा नाहक त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांबरोबरच पादचाºयांनाही सहन करावा लागत आहे. हाकेच्या अंतरावर धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय असतानाही पदपथ मोकळा श्वास कधी घेणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.