पुणे : जिल्ह्यातील विशेषत: खेड पट्टयातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची कांदा पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. तसेच दुचाकी चालकांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपिट उडाली. अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेले नागरिक या पावसामुळे सुखावले आहेत. तसेच काही भागांमध्ये गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले होते. या पाण्यामधून वाहनचालकांना कसरत करत आपली वाहने काढावी लागत होती.आळंदीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसआळंदी : कित्येक दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या आळंदी, केळगाव, डुडूळगाव, चऱ्होली आणि मोशी परिसरातील नागरिकांना बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला.तासभर झालेल्या मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ऐनदुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची काही वेळ तारांबळ उडाली. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनी भेटेल तिथे आसरा घेत पावसापासून बचाव केला. वाऱ्यासह पाऊस असल्याने काही झाडेही उन्मळून पडली. काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वाऱ्यामुळे पावसाची रिपरिप मोठ्या प्रमाणात जाणवत होती. रस्ताच दिसेनासा झाल्याने आळंदी-भोसरी रस्त्यावर वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. चौकात जागोजागी पाण्याची डबकी साचल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अवघड जात होते. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडताना दिसून येत होते. चासकमानला अवकाळी पावसाने झोडपले४चासकमान : गेल्या काही दिवसांपासून तापत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही सोसत असलेल्या लोकांना अवकाळी पावसाने हजेरी लावत चांगलाच दणका दिला. या अवकाळी पावसाने खेडच्या पश्चिम भागासह चासकमान परिसरात हैदोस घातला. अवकाळी पावसामुळे अनेकांचे हाल झाले. शिवाय, अनेकांना आर्थिक फटकाही बसला. शेतातील पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. ४बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. पाऊस सुमारे एक तास सुरू होता आणि जोर कायम असल्याने चासकमान बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी साचले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उन्हाळी कांद्यासह बाजरी, धना, मेथी व मक्याचे मोठे नुकसान झाले. विठ्ठल दाजी टोके यांच्या शेडची भिंत कोसळली.४राम बबन टोके यांच्या घरासमोर नारळाचे झाड तुटले व घरावर विद्युत खांब कोसळला. लहू मुळूक व सुभाष रासकर यांचे कांदे भिजून नुकसान झाले. सलग एक तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला खरा, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात उघड्यावर पडलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. परिसरातील वीटभट्ट्यांचेसुद्धा अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
By admin | Published: May 12, 2016 1:18 AM