लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेकडील संघटित गुन्हेगारीविरोधी पथक दक्षिण विभागातर्फे गुन्हेगारांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे असा २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक द्वारकानाथ सरोदे (वय २७, रा. ५४/५५ शनिवार पेठ,अमृतेश्वर मंदिर) व धनंजय प्रकाश काळे (रा. शिवपुष्प पार्क प्लँट नं. ३२) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. काळेविरुद्ध विश्रामबाग, खडक, दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गर्दी, मारामारी, जखमी करणे, दारू पिऊन गोंधळ घालंणे व सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सीआरपीसी ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक पोलीस फौजदार राजेंद्रसिंग चौहान, शंकर जांभळे, पोलीस हवालदार गणेश साळुंके, भालचंद्र बोरकर, सुनील चिखले, प्रवीण तापकीर, दीपक भुजबळ, संजय बरकडे, पोलीस कॉ. कैलास साळुके, राकेश खुणवे, प्रवीण पडवळ, विवेक जाधव, नितीन रावळ, रमेश चौधर व चालक गंगावणे यांनी ही कामगिरी केली. संघटित गुन्हेगारीविरोधी पथक शहरात गस्त घालत असताना विनायक सरोदे याच्याकडे एक बनावटीचे पिस्तूल व राऊंड असून, तो विक्रीसाठी सिंहगड रस्त्याच्या विठ्ठलवाडी कमानीजवळ थांबलेला आहे. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे स्टीलचा चॉपर सापडला. त्याच्याकडे गावठी कट्टा व राऊंडबाबत सखोल चौकशी केली असता त्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला त्याचा मित्र धनंजय काळे याच्याकडे गावठी कट्टा व राऊंड ठेवले असल्याचे सांगितले. काळे याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
घातक शस्त्रे बाळगणारा अटकेत
By admin | Published: May 31, 2017 2:45 AM