जेजुरी : नाझरे जलाशयात गेल्या महिनाभरात एकूण चार भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेच निदर्शनास येत आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल स्थानिक नागरिकांबरोबरच भाविकही विचारू लागले आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. देवदर्शनाला आल्यानंतर भाविक मोठ्या श्रद्धेने कºहास्नानासाठी जलाशयावर जातात. स्नान उरकून तेथेच कुलधर्म कुळाचाराचे विधीही करून घरातील देवघरातील देवमूर्र्तीसह खंडोबागडावर देवदशर्नासाठी जातात. या अत्यंत धार्मिक श्रद्धेमुळे नाझरे जलाशयावर महिला, पुरुष, लहान मुले यांची मोठी संख्या असते. जलाशयात स्नान करण्यासाठी सर्वच जण जलाशयात पाण्यात उतरतात. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सुरक्षेची यंत्रणा नसताना जलाशयात उतरल्याने अनेकदा भाविकांना दु:खद घटनांना सामोरे जावे लागते.गेल्या महिनाभरात एका लहान मुलासह तीन तरुण भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात गेल्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ उपासण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला असल्याने तेथे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. यामुळे भाविकांना स्नान करताना खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे अशा घटना घडू लागल्या आहेत. घडलेल्या घटनाबाबत वर्तमानपत्रातून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. बातम्यांनंतर केवळ कार्यवाहीच्या घोषणा होत आहेत. भाविकांत लहान मुले, महिला, पुरुष मोठ्या संख्येने आजही स्नानासाठी जलाशयात उतरत आहेत. भाविकांतूनच नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकही याबाबत मोठी नाराजी व्यक्त करीत आहेत. अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
नाझरे धरणावर धोका!
By admin | Published: May 15, 2014 5:17 AM