वाघोली : लोणीकंद ( ता:हवेली) येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.१६) मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. त्यात सहा लाख रुपये रक्कम होती. लोणीकंद येथील एटीएम मशीन चोरून नेण्यापूर्वी केसनंद येथील एटीएम मशीन चोरून नेण्याचा व फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. सदरचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी एटीएमची निर्मिती व सेवा देणाऱ्या युरोनेट सर्व्हिस प्रा. लि. कंपनीचे असिस्टंट मॅनेजर रामचंद्र मल्लिकार्जुन जाधव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चोरून नेण्याचा व फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता मात्र एटीएम चोरण्यात यश आले नाही. त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी चोरून नेले. चोरून नेलेल्या एटीएममध्ये सहा लाखांची रोख रक्कम होती. चोरट्यांनी रोपच्या सहाय्याने एटीएम ओढून नेऊन पिकअप टेम्पोमध्ये टाकून फरार झाले. चारच्या सुमारास चोरीचा प्रकार समोर आला. दोनच दिवसापूर्वी एसपी साहेबांनी पुणे आणि सोलापूर रोडवरील पोलिसांना गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते . मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरट्यांनी चोरीचा प्रकार आहे. पोलिसांनी एटीएम चोरीची गंभीर दखल घेतली असून लोणीकंद पोलिसांच्या पथकासह एलसीबीचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत.