पिंपरी: जेवण देण्यास उशीर झाल्याने तोडफोड करून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रीकरणासाठी आल्याने आरोपी हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
सलमान मोहम्मद अकरम खान (वय २४, रा मुंबई), अनिल गुप्ता (वय ४२, रा.ठाणे), धर्मेन्द्र कुमार (वय २८, रा. ठाणे), सूर्यकांत साहू (वय ३१, रा. मुंबई), अनिल तानाजी पराडकर (वय ३९, रा. मुंबई), गौतम शर्मा (वय ४२, रा. बिहार), सुहास रंजन (वय ५१, रा. बिहार), कुलदीप विश्वकर्मा (वय ३३), राजकुमार यादव (वय ४०, दोन्ही रा. झारखंड), बालू शाहू (वय ४०, रा. मुंबई), भानूप्रताप सिंग (वय ३०, रा. झारखंड), प्रतीक पवार (वय २७, रा. उत्तर प्रदेश), विजय लालजी यादव (वय २३, रा. मुंबई) व इतर पाच ते सहा लोक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमे इंटरटेनमेंट अँड मोशन पिक्चरकडील स्टाफ चित्रीकरणासाठी हिंजवडी येथे आले होते. त्यामुळे फिर्यादीच्या हॉटेलमध्ये ते थांबले होते. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून रविवारी रात्री जेवण देण्यास उशिर झाला. या कारणावरून आरोपींनी चिनी मातीच्या प्लेटने कर्मचाऱ्यांच्या हातावर मारले. आरोपींनी संगनमत करून हॉटेलच्या डायनिंग हॉलमधील १६ डिनर प्लेट तोडल्या, ११ खुर्च्या तोडून दोन रूममधील टीव्ही फोडले. तसेच बेड मॅट्रेस फाडल्या, बाथरूमच्या काचा फोडल्या. आठ पिलो कव्हर्स, चार बेडशीट फाडल्या, हॉटेलमधील इतर रूममध्ये देखील सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान केले. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. रिसेप्शनवर काम करणाऱ्या मुलीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.