लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या काळात कामधंदा नसल्यामुळे एक तरूण बेरोजगार होता. पैशांची अडचण सोडविण्यासाठी त्याने सायकल चोरण्याची नामी शक्कल लढविली आणि तो सायकलचोर बनला. गार्डन परिसरात सायकलवर येणा-या नागरिकांवर पाळत ठेवत त्यांच्या सायकली चोरण्यास तरूणाने सुरूवात केली. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सायकलचोर सुटला नाही. अखेर पोलिसांनी त्याला पकडले.
तरूणाने हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटर, भोसले गार्डन, मगरपट्टा सिटी, मांजरी, हडपसर परिसरातून सायकली चोरल्या. त्याच्याकडून १ लाख ५५ हजार रूपयांच्या १४ सायकली जप्त केल्या आहेत.
आशिक जीवन आले (वय २४, रा. मुंढवा, मूळ-दार्जिलिंग, पश्चिम बंगाल ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. १९ जुलैला एका तरूणाची मांजरी बुद्रूक परिसरातून सायकल चोरीला गेली होती. त्यासंबंधी पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार समीर पांडुळे आणि प्रशांत दुधाळे यांना सायकल चोर तरूणाची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आशिक आले याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हडपसर, चंदननगर परिसरातून १४ सायकली चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे यांनी केली.
----------------------------