- किरण शिंदे
पुणे : इस्तियाक आणि राहुल, पिंपरी चिंचवड परिसरात राहणारे..दोघेही चांगले मित्र, जिगरी यार... परिसरात त्यांच्या मैत्रीचं उदाहरण दिलं जायचं.. मात्र 3 जुलै च्या रात्री असं काही घडलं की यातील एकाचा खून झालाय आणि दुसरा मात्र गजाआड गेलाय.. नेमकं काय झालं होतं या दोघांमध्ये? कुणाचा खून झालाय आणि कोण गजाआड गेलं ते ही बातमी वाचल्यावर समजेल.
इस्तियाक, राहुल आणि त्याच्या मित्रांनी गुरुवारी रात्री मद्याची पार्टी केली. याच पार्टीत आधीच्या भांडणावरून राहुल आणि इस्तियाक यांच्यात वादाला तोंड फुटलं. तेव्हा इस्तियाक याने राहुलकडे मला तुझे रक्त प्यायचे आहे अशी अघोरी इच्छा व्यक्त केली. इतकच नाही तर इस्तियाक उठला आणि रक्त पिण्याच्या उद्देशाने राहुलच्या मानेचा कडकडून चावाही घेतला. चवताळलेल्या इस्तियाकच्या तावडीतून राहुलने कशीबशी सुटका करून घेतली आणि पळ काढला. मात्र झालेल्या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या राहुलने भयानक निर्णय घेतला.
चांगला मित्र असल्यामुळे राहुलला इस्तियाकविषयी संपूर्ण माहिती होती. तो कुठे जातो, कुठे झोपतो, कुठे राहतो याविषयी त्याला इत्यंभूत माहिती होती. मध्यरात्रीच्या सुमारास इस्तियाक आणि त्याचा मित्र घराबाहेर दगडी ओट्यावर झोपले होते. राहुल त्या ठिकाणी पोहोचला आणि झोपलेल्या अवस्थेत असलेल्या इस्तियाकच्या डोक्यात त्याने भला मोठा दगड घातला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
इस्तियाकने केलेली अघोरी मागणी जिव्हारी लागल्याने राहुलने बदला घेण्याच्या उद्देशानेच त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पळूनही गेला होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी कुठलाही पुरावा मागे नसताना अवघ्या काही तासात आरोपी राहुल लोहार याला बेड्या ठोकल्या. मात्र मित्राकडेच अघोरी मागणी केल्याचा आणि त्यातून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात एकच खलबळ उडाली.
- सोमनाथ पांचाळ ( सहाय्यक पोलीस निरीक्षक)