पांडुरंग मरगजे
धनकवडी : तुमच्या जन्माच्या दिवशी नक्की वार कोणता होता तुम्हाला चटकन आठवेल ? नाही ना ! पण एक अवलिया असा आहे जो गेल्या दहा हजार वर्षातील कोणत्याही माणसाच्या जन्मतारखेवरून त्याचा जन्माचा दिवस एका क्षणात सांगू शकतो. अलीकडेच हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये या कसबाची विक्रमी नोंद झाली आहे. धनकवडी येथे वास्तव्यास असलेले लक्ष्मण गोगावले हे ते कुशाग्र व्यक्तिमत्त्व. गोगावले हे एक ते हजार पर्यंतचा कोणत्याही आकड्यांचा पाढा ते म्हणू शकतात. त्याचबरोबर एक ते हजार संख्येपर्यंतची कोणत्याही आकड्यांची वर्गसंख्या विचारली तर काही क्षणात उत्तरही देतात.
तारखेवरुन वार सांगण्याची जी जुनी प्रचलित पद्धत आहे त्यामध्ये त्या तारखेतील वर्षाचा आकडा, त्या वर्षांपर्यंत येणाऱ्या लीप वर्षाचा आकडा अशा या चार अंकांची बेरीज करुन त्यास नंतर सातने भागून उरलेल्या बाकीवरुन त्या तारखेचा वार सांगितला जातो. या पद्धतीने अचूक वार सांगण्यास थोडा वेळ लागतो. लक्ष्मण गोगावले यांनी मात्र चाळीस वर्षांपूर्वी संशोधन केले की दर अठ्ठावीस वर्षांनंतर दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होते. या २८ वर्षाचा त्यांनी एक तक्ता बनवला आहे व तो त्यांना तोंडपाठ आहे. त्यामुळे ते हजारो वर्षातील कोणत्याही तारखेचा वार अवघ्या काही सेकंदातच सांगतात आणि समोरच्याला अवाक करून सोडतात.
याबाबत लोकमतशी बोलताना गोगावले म्हणाले गणितातील काही युक्त्या, समिकरणे व पाठांतरामुळे हे शक्य होते. याशिवाय, त्यांनी गणित विषयामध्ये भरपूर लेखनही केले आहे. एक आंतरराष्ट्रीय संशोधन केले आहे. त्यांचे ते संशोधन सहा आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. गोगावले यांनी भूमितीतील पाय ची निश्चित व अचूक किंमत शोधल्याचा दावा केला असून लंडन येथील इंटरनँशल आँर्गनायझेशन आँफ सायंटिफिक रिसर्च या जागतिक स्तरावरील संस्थेने त्याची दखल घेतली आहे.
विशेष म्हणजे, गोगावले यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले आहे. तरीही त्यांनी गणित या विषयावर आतापर्यंत लिहिलेली बारा पुस्तके प्रकाशित झाली असून एक लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. गोगावले हे बँकेतील अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करीत असतात. तसेच त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रभर फिरुन चार हजार मोफत व्याख्याने दिली आहेत.