पुणे : ‘चित्रपटसृष्टीत रिस्क घेऊ नका, असे म्हटले जाते. जे लोकांना आवडतं तेच करा,’ अशी यशाची गुरुकिल्ली असते. पण मला ते मान्य नव्हते. मी माझे काम नुकसान होईल, हे गृहीत धरून केले. त्यामध्ये ‘वासनांध’, ‘गोची’ अशी प्रवाहाविरोधात जाणारी नाटकं केली. त्यावर प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला. पण, मला धंदेवाईक नाटकं करायची नव्हतीच ! मी कमाईसाठी कधीच नाटक केले नाही. धंदेवाईक म्हणून तेच तेच प्रयोग करण्याचा किंवा सहाशे प्रयोग करण्याचा मला कंटाळा येतो, मला जे करायचे ते मी केले, त्यामुळे आज मी कृतकृत्य आहे,’’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या.मधुश्री पब्लिकेशन, वेस्टलॅन्ड बुक्सतर्फे प्रकाशित आणि अमोल पालेकरलिखित ‘ऐवज-एक स्मृतिबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ‘एनएफएआय’मध्ये झाले. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, संध्या गोखले उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर कवी बालाजी सुतार यांनी पालेकर यांची मुलाखत घेतली.पालेकर म्हणाले, ‘मूठभर लोकांना जे खटकतं, जे बोलून दाखवायचे धैर्य नसते, ते म्हणजे सर्व गोष्टींवर रोडरोलर फिरवल्यासारखे आहे. विरोध, बंडखोरी हे खूप स्ट्राँग शब्द आहेत. मी जन्माला आलो तेव्हा बंडखोर नव्हतो. मला जे करायचे ते मी करणारच, तुम्हाला पसंत नसेल तर मी वेगळी वाट चोखाळली.मी सर्व क्षेत्रात हेच करत राहिलो. याचे धैर्य मला कुठून आलं, तर माझ्या आजूबाजूला खूप मोठे दिग्गज लोक होते. त्यांच्याकडून हे सर्व धैर्य आले. मी मराठीच्या कक्षेबाहेर गेल्यामुळे मी सर्वांशी बोललो आणि शिकलो. त्याच्यातून मी दुरस्थपणे, तटस्थपणे पाहण्याचे शिकलो.’मराठी, गुजरातीने काेणतं घोडं मारलंय हो !अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची तसदी कोणी घेत नाही. प्रेक्षक बघ्याची भूमिका घेतात. सेन्साॅर विरोधी भूमिकेला त्यांनी पाठिंबा द्यायला हवा. आज जाहीर भाषणं कशीही होतात, त्यावर मात्र कसलेही बंधन नसते. पण मराठी, गुजराती नाटकांवर सेन्सॉरशिप लावली जाते. यांनी कोणतं घोडं मारलंय हो !, असा थेट सवाल सई परांजपे यांनी सरकारला विचारला.सध्या लोकशाहीची घुसमट होतेय. सहिष्णुता आता संपुष्टात येत आहे. आरक्षण हे सामाजिक शाप होतोय. समाजात तेढ, दुजाभाव निर्माण झालाय. हा शिंदे म्हणजे मराठा, तो चित्पावन ब्राह्मण अशी लेबलं कधी लावली जात नव्हती, आता लावली जाताहेत. आपण माणसाला माणूस म्हणून कधी ओळखणार आहोत, असाही सवाल सई परांजपे यांनी उपस्थित केला.
अमोलच्या कलाविष्काराचे खूप पदर आहेत. प्रायोगिक नाट्यकर्मी, चित्रकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असा विविध पैलू असलेला अमोल. यात सर्वांत अग्रणी ध्येयनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, भला इसम म्हणजे अमोल. त्याला बंधनमुक्त राहण्याचा हव्यास आहे. राज्य प्रस्थापनेला त्याने टक्कर दिलीय. कलाकारांच्या हक्कावर आक्रमण झाले, तेव्हा त्याने त्याला विरोध केला.- सई परांजपे, ज्येष्ठ दिग्दर्शिका