लोकमत न्यूज नेट वर्क
पुणे : हातात तलवार घेऊन जबरदस्तीने घरात शिरून छोट्या भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या घरातील इतरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून घरातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. ही घटना रामटेकडी येथे बुधवारी सकाळी ११ वाजता घडली.
याप्रकरणी शौकिन हकिम सय्यद (वय ३४, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा लहान भाऊ मतिन हकिम सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मतिन हा फिर्यादी शौकिन याचा लहान भाऊ आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हातात नंगी तलवार घेऊन तो जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घुसला. त्यानंतर फिर्यादीच्या अंगावर धावून जात त्यांचा गळा दाबला. दरम्यान, फिर्यादी हे त्याला प्रतिकार करत असताना, त्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. हा प्रकार पाहून घरातील इतर जण हा वाद सोडविण्यासाठी आले असता, त्यांना सुद्धा आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केली. परिसरातील नागरिकांनी भावाला मदत करु नये म्हणून आरोपीने हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केली. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.