पुणे : ‘त्यांना’ सामाजिक कार्याची आवड होती. त्यासाठी अनेक सामाजिक कार्य त्या करत असत. पण आयुष्याच्या अर्ध्यावरच त्यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला. अखेर त्यांचे चार अवयव दान करण्यात आले. त्यामुळे या अवयव रूपात त्या मृत्यूनंतरही जीवंत राहणार आहेत. त्यांचे नाव वर्षा नंदकुमार मोहिते. त्यांच्या अवयव दानामुळे चार जणांना लाभ मिळणार आहे. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या कोथरूड येथील रहिवासी वर्षा मोहिते (वय ५४) यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला होता. यानंतर त्यांच्या पतीने अवयव दानासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्षा मोहिते यांना २० सप्टेंबर रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी २४ सप्टेंबर रोजी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तत्काळ अवयव दान करण्याची तयारी दर्शवली. उपचार घेत असलेल्या खासगी रूग्णालयात अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण करण्याची अद्ययावत सुविधा होती. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासक यांनी याबाबत तत्परता दाखवली. रुग्णालयातील तज्ञ शल्यचिकित्सकांमुळे त्यांना डोळे, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड हे अवयव दान करता आले. संघर्ष करून शिक्षण पूर्ण केलेल्या आणि स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी धडपडत असलेल्या मनमिळावू स्वभावाच्या वर्षा मोहिते या सर्वांना मदतीस तत्पर असायच्या. त्यांचे पती प्रा. नंदकुमार मोहिते यांनीही अवयव दानाची चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली.