पिंपरी : गेल्या दहा वर्षात मावळचे खासदारपद असून सुद्धा त्यांनी मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आणला नाही, अशी टीका मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीच्या आकुर्डीत झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, मानव कांबळे, मारुती भापकर, अनिता तुतारे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्योती निंबाळकर आदी उपस्थित होते.
बारणे यांचा अभ्यास कमी...
वाघेरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात आमचे मोठे योगदान आहे. मी आणि माझे वडिलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर म्हणून काम केले आहे. माझी पत्नी गेली पंधरा वर्षे नगरसेविका आहे त्यामुळे बारणे यांचा अभ्यास कमी असल्याचा टोला लगावला. दहा वर्षात मावळ मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आला नाही. मतदारसंघात औद्योगिक पट्टा मोठा असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. पर्यटनाला चालना दिली नाही. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पवना नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.
पावणेचार लाखांचे लीड घेणार..
संजाेग वाघेरे म्हणाले, येत्या मंगळवारी मावळ लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरणार असून सेनाप्रमुख आदित्य ठाकरे,काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर आणि महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होईल, असा दावा वाघेरे यांनी केला.