पुणे : अशोक चव्हाण यांच्या बरोबर कोण जात आहे. अशा काही वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार? अशी उपहासात्मक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. ते एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याविषयी विचारले असता चव्हाण म्हणाले, अशोक रावांच्या प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत जे.पी नड्डा यांच्यासमोर ठरला होता. तो झाला नाही. मग छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरला होता. पण आरएसएसच्या लोकांनी तीव्र निषेध केला. तिथला शाह यांचा दौरा रद्द झाला. यामुळे प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत घ्यावा लागला. चव्हाणांच्या भाजपबरोबर वाटाघाटी बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटमध्ये महत्वाचे खाते पाहिजे होते. ते त्यांना मिळाले नाही. भाजपकडूनच विरोध झाला. त्यामुळे त्यांना एका अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढले आहे. त्यांना उमेदवारी लखलाभ आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
तुम्हाला काही ऑफर आली आहे का? त्यावर ' मला कोण ऑफर देणार? अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. कुणीही नेता गेला तरी नुकसान हे होतेच. किती मोठं नुकसान होईल ते सांगता येत नाही. लोकांना भाजपच्या कार्यशैलीबद्दल चीड आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल. परंतु कार्यकर्त्यांनी सोडून जाऊ नये असाच आमचा प्रयत्न असतो. पण त्यांची कोणती अपरिहार्यता होती, कुणाला काय पद दिले गेले? हे आम्हाला माहीत नाही. कुणाला राज्यसभेची उमेदवारी दिली जात आहे. कुणाला संस्थेची चौकशी करून त्यातून सुटका देण्याची आणि शांत झोप येऊ देण्याची भीती घातली जात आहे. कशासाठी कोण गेले? हे त्यांना विचारले पाहिजे असेही ते म्हणाले.
एकीकडे नेत्यांना भ्रष्टाचारी, ७० कोटींचा घोटाळा केला म्हणतात आणि नंतर त्यांना पक्षात सहभागी करून घेतात. नक्की त्यांची विचारधारा काय आहे? किती संधीसाधू राजकारण नरेंद्र मोदी आणि भाजप करीत आहेत. हे भारत आणि महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्यसभेसाठी जे सहा उमेदवार दिले आहेत. त्यातील तीन माजी काँग्रेसचेच आहेत. आमची सर्व आमदारांबरोबर बैठक चालू आहे. उद्या (दि. १५) सकाळी ९.३० वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक असल्याचेही त्यांनी सांगितले.