पुणे : एकदा का सात फेरे घेऊन नवीन संसाराला सुरुवात केली की बायकोला खुश करण्यासाठी नव नवे फंडे वापरणाऱ्यांची आपल्याकडे काही कमतरता नाही. प्रत्येक जण आपापल्यापरीने तुमच्यासाठी काय पण म्हणत पत्नीचे मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. पण पुण्यात एका बहाद्दराने कमालच केली. त्याने असं काही पाऊल उचललं की बायको खुश झाली पण त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली.
याप्रकरणी पोलिसांनी माळवाडी परिसरात राहणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याचे नाव रोहन बिरू सोनटक्के (वय २१) असे आहे. तो बायकोची हौस पुरवण्यासाठी व मन जिंकण्याच्या उद्देशाने शहरातील विविध दुकानांतून चक्क साड्या तसेच ड्रेसची चोरी करत होता. साडी चोरण्यासाठी तो नवनवीन पद्धत वापरत असे. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या कसून चौकशीत तो साड्यांबरोबरच मोबाइल, लॅपटॉप आणि गाड्याही चोरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १८ मोबाइल, ३ लॅपटॉप, ३० साड्या, १२ ड्रेस यांसह विविध ठिकाणी चोरलेल्या काही गाड्या असा अंदाजे साडे तेरा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन सोनटक्के याचे नवीनच लग्न झाले होते. त्यामुळे तो आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी साड्या, ड्रेस चोरण्याचं काम करत होता. त्याचबरोबर तो मोबाईल, लॅपटॉप, गाड्या यांची देखील चोरी करत असे. पण त्यादिवशी रोहन हडपसर येथील ॲमनोरा मॉल परिसरात चोरलेल्या मोबाइलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना मिळाली होती. त्या आधारे लोणारे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी रोहन याला अटक केली आहे. गुन्हे शाखेला त्याच्यासंबंधी ९ गुन्हे उघडकीस आणले आहे.