विशाल दरगुडे पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यतीला खूप महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे शेतकरी हा आपल्या बैलाला जिवापाड जपून त्याची काळजी घेत असतो. बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या बैलाने आपल्या मालकाला सर्वत्र नावलौकिक मिळवून स्वतःची देखील एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा मृत्यू झाल्यावर ह्या बळीराजाच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. या कुटुंबाने आपल्या लाडक्या बैलाची आठवण म्हणून सर्व विधी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी 'संज्या' बैलाचा दशक्रिया विधी करून त्याची आठवण कायम स्मरणात राहावी या हेतूने शेतामध्ये त्याचे स्मारक उभारले आहे.
अहमदनगरमधील पठारवाडी येथे संज्याचा जन्म झाला. केवळ एक वर्षाचा असतानाच कांताराम पठारे यांनी त्याला विकत घेतले. १७ वर्षीय संज्या बैलाने पुणे जिल्ह्यामध्ये विविध बैलगाडा शर्यतीमध्ये या बैलाने नंबर एकचा मानकरी ठरून मोठे नाव कमावले होते. फुलगाव येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये या बैलाला 'हिंदकेसरी' हा किताब देण्यात आला. या बैलाने पठारे यांचे नाव ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातुन घरोघरी पोहचवले. मात्र बैलाचे निधन झाल्याने पठारे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माणसाप्रमाणे पठारे यांनी आपल्या लाडक्या बैलाला निरोप देत दशक्रिया विधी मध्ये मुंडन करून दुखवटा पाळला.2013 पासुन बैलगाडा शर्यतबंद असल्याने अनेकांनी बैलांची विक्री केली. मात्र कांताराम पठारे याला अपवाद आहेत.
खराडी येथील शेतकरी कांताराम दत्तोबा पठारे यांच्या संज्या बैलाचे 2 सप्टेंबरला निधन झाले. त्यामुळे पठारे कुटुंबाने आपल्या लाडक्या बैलाची आठवण म्हणून सर्व विधी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी 'संज्या' बैलाचा दशक्रिया विधी करून त्याची आठवण कायम स्मरणात राहावी या हेतूने कांताराम पठारे यांनी मरकळ (ता.खेड) येथील त्यांच्या शेतामध्ये त्याचे स्मारक उभे केले आहे.
.......
जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी माझी ओळख हिंदकेसरी म्हणुन माझ्या संज्याने ओळख निर्माण केली. पहिल्यांदाच एखाद्या माणसाला त्याच्या बैलामुळे ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे ही ओळख व संज्याची आठवण कायम सोबत राहवी म्हणुन संज्याचे स्मारक उभारले आहे.-कांताराम दत्तोबा पठारे,स्व.संज्याचे(बैलाचे)मालक'