पुणे : कोरोनाकाळात नाती दुरावण्याच्या शेकडो घटना समोर येत आहेत. नातेवाईक भीतीने मृतदेह स्वीकारायला जात नाहीत. अशा स्थितीमध्ये ना जातीचे ना धर्माचे केवळ माणुसकीचे नाते जपत सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते कोरोनाच्या मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. मागील वर्षभरात हजारो मृतदेहांवर त्यांच्या त्यांच्या धार्मिक प्रथेप्रमाणे अंत्यविधी करून समाजात सर्वधर्मसमभाव आणि एकतेचा संदेश या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळून आला, तर ३० एप्रिल रोजी ५२ वर्षीय नागरिकाचा पहिला बळी गेला. कोरोनाबाबत अनेक गैरसमज असल्याने नातेवाईक आणि मित्र रुग्णांपासून लांब राहत होते. त्यांना धीर द्यायलाही फारसे कोणी जात नव्हते. अशा स्थितीत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यावर तर मृतदेह स्वीकारणे आणि अंत्यसंस्कार करणे तर दूरच राहिले. अनेकजण तर अस्थी घ्यायलाही फिरकले नाहीत. या काळात काही संस्था अंत्यविधीसाठी पुढे आल्या.
आपला धर्म वेगळा... आपली भाषा आणि उपासना पद्धती वेगळी... असा कोणताही भेद मनात न ठेवता या संस्थांनी शहरातील मृतदेह व्यवस्थापनाच्या कामात पालिका प्रशासनाला मदत करण्यास सुरुवात केली. या कामात विशेषतः मुस्लिम समाजातील कार्यकर्ते पुढे आले. सुरुवातीला मूलनिवासी मुस्लिम मंच, पीपीएफ, उम्मत सोशल फाऊंडेशन या संस्था काम करीत होत्या. या कामात दि मुस्लिम फाऊंडेशन, अल्फा आमेगा ख्रिश्चन महासंघ, ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्था सहभागी झाल्या. आजमितीस या सर्व संस्थानी केलेल्या अंत्यविधींचा आकडा साडेचार हजारांच्या घरात पोचला आहे. हे काम अद्याप सुरू आहे. हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन-शीख-पारसी-बोहरी-लिंगायत आदी धर्मांच्या रुग्णांच्या मृतदेहांवर त्यांच्या त्यांच्या धार्मिक प्रथेप्रमाणे अंत्यविधी केले आहेत. धार्मिक भेदाच्या भिंती ओलांडून सामाजिक सौहार्दाची एक नवी ‘नाळ’ या कार्यकर्त्यांनी जोडली आहे.
------