पुणे: दारूविक्री खुली झाल्याने निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या परप्रांतीय मजूर तसेच बेघरांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. महापालिकेच्या कोरेगाव पार्क येथील कस्तूरबा शाळेतून मंगळवारी रात्री असा पळ काढणाऱ्या चौघांंना पोलिसांनी चोप दिला व पुन्हा आत टाकले.या शाळेत एकूण १३५ जण आश्रयाला आहेत. २७ मार्चपासून ते याच ठिकाणी मुक्कामास आहेत. बेघर, निराधार तसेच परप्रांतीय मजूर, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर वगैरेंचा त्यात समावेश आहे. त्यात ५ महिलाही आहेत. शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.साधू वासवाणी मिशनच्या वतीने त्यांना सकाळी व संध्याकाळी चहा, दूपारी व रात्री जेवण मिळते. त्यांच्या अंथरूण पांघरूणाचीही व्यवस्था मिशनने केली आहे. त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ पाण्याचे टँकर मागवण्यात येतात. एका वर्गखोलीत ५ ते ८ जण अशी सोय आहे. बाथरूम, टॉयलेटही आहे.इतके सगळे व्यवस्थित असतानाही त्यांच्यातील काहीजणांकडून सहकार्य मिळत नाही असे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेले रखवालदार भोसले यांनी सांगितले.मद्यविक्री सुरू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्यातील बरेच जण अस्वस्थ झाले होते. ग्रूप करून त्यांची चर्चा सुरू होती. पोटात दूखते, दवाखान्यात जायचे आहे, औषध खरेदी करायचे आहे, मित्राला भेटून येतो असे बहाणे करून दुपारीच पळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र साहेब आल्याशिवाय जाता येता येणार नाही म्हणून त्यांना संध्याकाळपर्यंत थांबवले.मात्र रात्रीच्या जेवणाआधी त्यांच्यातील चौघांनी पळ काढला, पण त्याची लगेच माहिती मिळाल्याने १०० नंबरला फोन केला. कोरेगाव पोलिस चौकीच्या चार पोलिसांनी त्याची दखल घेत चौघांनाही लगेच शोधले व पुन्हा केद्रात आणून सोडले अशी माहिती रखवालदार भोसले यांनी दिली.या केंद्राचे व्यवस्थापक, पालिकेचे सहायक शिक्षणाधिकारी विजय आवारी म्हणाले, सर्वांची नीट व्यवस्था केली आहे. जेवण चहा सगळे वेळच्यावेळी मिळते आहे. दर दोन दिवसांनी एका स्वतंत्र वैद्यकीय पथकाद्वारे त्यांची वैद्यकीय तपासणीही होत आहे. परराज्यातील मजूरांना स्थलांतर करण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांच्यातील काहींना तूम्हाला जायचे आहे का असे विचारले, मात्र त्यांनी आमचे काम सुरू होणार आहे असे सांगून नकार दिला. काहीजण वेटर आहेत, त्यांनीही हॉटेल सुरू झाले की आम्हाला काम मिळेल, त्यामुळे सध्या इथेच बरे आहे असे सांगितले. काहीजण मात्र इथून पळून जाण्याच्या बेतात आहेत, मात्र पोलिसांना कळवल्यावर ते शांत झाले आहेत.
दारूची दुकाने सुरु झाल्याने निवारा केंद्रातून " त्यांनी " काढला पळ; पोलिसांनी चोप देऊन टाकले पुन्हा आत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 8:58 PM
पुण्यातील एका शाळेत मुक्कामाला परप्रांतीय मजूर तसेच बेघरांमध्ये पळापळ सुरू
ठळक मुद्देसाधू वासवाणी मिशनच्या वतीने निवारा केंद्रात चहा, दूपारी व रात्री जेवण व्यवस्था